कणकवली : दिनांक : २६ सप्टेंबर २०१९ :
प्राथमिक शाळेपासूनच लहान मुलांना संस्कारांचे बाळकडू पाजावे लागते. स्काऊट- गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जर सुसंस्कारित बनवायचे असेल तर प्रत्येक शाळेने विद्यार्थी स्काऊट- गाईड पथकाची नोंदणी करून जागतिक संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले पाहिजे असे आवाहन सिंधुदुर्ग भारत स्काऊट्स आणि गाईड्स संस्थेच्या चिटणीस सुलभा देसाई यांनी केले.त्या म्हणाल्या कि स्काऊट उपक्रमामुळे शाळेमध्येच विद्यार्थ्यांना सत्कृत्य करण्याची सवय लागते. म्हणूनच स्काऊट गाईड उपक्रम अत्यावश्यक आहे.
कणकवली, वैभववाडी, देवगड व मालवण तालुक्यातून आलेल्या स्काऊटमास्तर व गाईडकॅप्टन यांचा उजळणी वर्ग संस्थेच्या वतीने कणकवली गटसाधन केंद्र येथे आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळी ८० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. तज्ज्ञमार्गदर्शक म्हणून सुलभा देसाई, शुभांगी तेंडोलकर, विजय मसुरकर, क्लारा डिसोझा, स्नेहा राणे यांनी अतिशय मुद्देसूद मार्गदर्शन केले.
स्काऊट प्रवेश, प्रथम सोपान , द्वितीय सोपान , तृतीय सोपान, राज्य पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार इत्यादी अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली. प्राविण्य पदके मिळवण्यासाठी काय करावे ते सांगण्यात आले. स्काऊट गाईडची तासिका कशी घ्यावी त्याचा अनुभव देण्यात आला. प्रार्थना, झेंडागीत, हावभाव गीत, चढाओढ, गाठीचे विविध प्रकार प्रात्यक्षिक रूपाने घेताना सर्व शिक्षकांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्काऊट ,रेन ,बल्ले बल्ले, बटरफ्लाय , चायनीज, शाब्बास क्लॅप्स यांचेही प्रत्यक्ष सामूहिक सादरीकरण घेण्यात आले. विविध प्रकारच्या आरोळ्या शिकवण्यात आल्या.
खरी कमाई , जिल्हा मेळावा, राज्य मेळावा , राष्ट्रीय जांबोरी , जागतिक जांबोरी यामध्ये सहभागी होण्यासाठी करावयाच्या उपक्रमांविषयी अधिक माहिती देण्यात आली. स्काऊट समुदाय प्रकल्प राबवताना करावयाचे उपक्रम गीतमंच, पाणपोई, स्वच्छता , गावजत्रा , आंगणेवाडी जत्रा, वसुंधरा विज्ञान केंद्र, व्यसनमुक्त जीवन, तंबाखूमुक्त शाळा, इंद्रधनुष्य मिशन, आपत्कालीन व्यवस्थापन, रक्तदान, पल्स पोलिओ , प्लास्टिक निर्मूलन इत्यादी मध्ये स्काऊट गाईड पथकाला सामावून घेऊन सामाजिक कार्यक्रमात सक्रिय होण्यासाठी प्रेरणा देण्यात आली.
प्रशिक्षणामध्ये कणकवली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनीही सदिच्छा भेट देत आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगत स्काऊट उपक्रम हा आजच्या काळाची गरज आहे असे स्पष्ट केले. निवडक प्रशिक्षणार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. शुभांगी तेंडोलकर यांनी आभार व्यक्त केले.