Saturday, February 29, 2020

नाभिक स्वयंसेवकांचा सन्मान हाच तळागाळातील बांधवांचा सन्मान : दिलीप चव्हाण

कणकवली : दिनांक : ०१/०३/२०२० :
                     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक संघटना अतिशय जोमाने कार्य करीत असून १० फेब्रुवारी रोजी कणकवलीत संपन्न झालेला वधू वर मेळावा हे संघटनेच्या एकीचे प्रतिक आहे असे गौरवोद्गार जिल्हा नाभिक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. कणकवलीतील सर्व स्वयंसेवकांनी केलेली मेहनत आणि जिल्हा नाभिकवासियांनी केलेले प्रासंगिक दौरे भरीव कार्य करणारे ठरले असे मनोगत जिल्हाध्यक्ष नाभिकरत्न अनिल अणावकर यांनी परमहंस भालचंद्र भक्त निवासात आयोजित ' नाभिकांच्या सन्मान सोहळ्यात ' व्यक्त केले.
                     जिल्हा नाभिक मेळावा उत्कृष्ट संपन्न केल्याबद्दल परिश्रमपूर्वक कार्य केलेल्या सर्व नाभिक बांधवांचा, स्वयंसेवकांचा सन्मान सोहळा कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण , कणकवली तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत चव्हाण , जिल्हा सचिव सुधीर चव्हाण , निवृत्त मुख्याध्यापक  दिगंबर चव्हाण, निवृत्त केंद्रप्रमुख दत्तात्रय चव्हाण , उपाध्यक्ष विठोबा चव्हाण , चंद्रकांत चव्हाण , जिल्हा महिला अध्यक्षा प्रतिभा चव्हाण , कणकवली महिला अध्यक्षा संजना चव्हाण ,कुडाळ अध्यक्ष नितेश पिंगुळकर , कुडाळ महिला अध्यक्षा विद्या चव्हाण , रुपेश पिंगुळकर, अनिल चव्हाण , किशोर लाड, जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण , सहसचिव हेमांगी अणावकर , महिला सचिव ईश्वरी कुबल  उपस्थित होते. कणकवली तालुक्यातील ७० पेक्षा जास्त स्वयंसेवकांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते जाहीर सन्मान करण्यात आला.
                     सन्मान झालेल्या स्वयंसेवकांनी आपापली मनोगते व्यक्त केली. निलेश चव्हाण, संजना चव्हाण, नाभिकरत्न विलास चव्हाण, चंद्रशेखर चव्हाण, दत्तात्रय चव्हाण , दिगंबर चव्हाण, प्रतिभा चव्हाण , विद्या चव्हाण, किशोर लाड, विठोबा चव्हाण , अनिल चव्हाण, सुधीर चव्हाण, नितेश पिंगुळकर, नंदकुमार चव्हाण, नाभिकरत्न शरद लाड, कणकवली उपाध्यक्षा प्रिया चव्हाण यांनी मेळाव्याबद्दलची सकारात्मक मते मांडली.
                    रचना राजन चव्हाण यांची जिल्हा संघटनेमध्ये महिला कार्यकारिणी सदस्या म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. संपदा मंगेश चव्हाण यांना ' नाभिक हिरकणी ' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कणकवली तालुका सचिव प्रवीण कुबल यांनी केले. आभार जिल्हा सचिव सुधीर चव्हाण यांनी मानले.








शालेय पोषण आहार ताई म्हणजे प्रत्येक शाळेच्या अन्नदात्या : सुहास पाताडे

तळेरे : दिनांक ०१/ ०३/ २०२० :
                 सध्या सर्व शाळांमध्ये  शालेय पोषण आहार शिजवून देण्याचे काम शालेय पोषण आहार ताई करत आहेत. स्वयंपाकी आणि मदतनीस म्हणून काम पाहणाऱ्या या शालेय पोषण आहार ताई म्हणजे आमच्या शाळांतील मुलांच्या अन्नदात्याच आहेत. त्यांच्यामुळेच आपल्या शाळांमधील विद्यार्थी दुपारच्या भोजनाचा लाभ घेत आहेत. त्यांच्याकडून शाळांना जे सहकार्य मिळत आहे त्याबद्दल तळेरे प्रभागाच्या वतीने विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी सर्व ताईंचे कौतुक केले आणि अतिशय समाधान व्यक्त केले.
                 जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागांतर्गत तळेरे नं. १ शाळेत ' स्वयंपाकी व मदतनीस ' यांचे एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी तज्ज्ञमार्गदर्शक म्हणून विस्तार अधिकारी सुहास पाताडे आणि शेर्पे- साळीस्ते केंद्रप्रमुख सदगुरु कुबल यांनी काम पाहिले. त्यावेळी शेर्पे केंद्रमुख्याध्यापक दशरथ शिंगारे, तळेरे नं. १ शाळेचे सत्यवान चव्हाण , खारेपाटण नं.१ शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, शिडवणे नं. १ शाळेचे प्रवीण कुबल , कोनेवाडी शाळेचे मंगेश खंबाळकर ,सूत्रसंचालक जाकीर शेख आणि ७१ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
                   प्रशिक्षणाचे उदघाटन शालेय पोषण आहार ताईंच्या शुभहस्ते करण्यात आले. सर्व प्रशिक्षणार्थी यांना जिल्हा परिषदेमार्फत मार्गदर्शक पुस्तिका , नोटबुक, पेन आणि प्रवासभत्ता देण्यात आला. माध्यान्ह भोजन करताना घ्यावयाची काळजी, आपत्कालीन संरक्षण, मेनूप्रमाणे स्वयंपाक बनवणे, शालेय वास्तूची साफसफाई करण्यात पुढाकार घेणे, स्वतःची आरोग्य तपासणी करून घेणे, चव घेऊन भोजन स्वतः वितरित करणे, बचतगट असल्यास हिशेब ठेवणे, साठ्याप्रमाणे धान्यादी माल शिल्लक असणे, दिलेल्या प्रमाणानुसार तांदूळ, तूरडाळ, हरभरा, चवळी, मसाला, जिरे, मोहरी, मुगडाळ यांचा भोजनात समावेश करणे, स्नेहभोजन असल्यास तो करण्यासाठी सहकार्य देणे, पूरक आहाराचे आवश्यकतेनुसार वाटप करणे इत्यादीविषयी सविस्तर व उदाहरणे देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यात चर्चा घडवून आणली. केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी सर्वांचे आभार मानले.






















Thursday, February 27, 2020

कणकवली ते राधानगरी अभ्यास दौरा घडला ज्ञानवर्धक : सद्गुरू कुबल

तळेरे : दिनांक : २८ फेब्रुवारी २०२० :
               समग्र शिक्षा राष्ट्रीय आविष्कार योजनेंतर्गत कणकवली तालुक्यातील ९ शाळांमधील ११८ अभ्यासू मुलांचा अभ्यास दौरा नुकताच पार पडला. त्यामध्ये चिंचवली मधली , शिडवणे नं. १ , तळेरे नं. १, लोरे नं. १ , कासार्डे देऊळकरवाडी, कणकवली नं. ३ , दिगवळे नं. १, वागदे नं. १ आणि जानवली मारुतीमंदिर या शाळांची निवड झाली होती. सदर शाळांमधील प्रत्येकी अभ्यासू १२ विद्यार्थ्यांना यात लाभ देण्यात आला. शासनाकडून प्रत्येक शाळेला २००० रुपये अनुदान देण्यात आले.
            राधानगरी धरण ( लक्ष्मी तलाव ) , काळंबावाडी, एक आदर्श ज्ञानरचनावादी प्राथमिक शाळा बोरवडे , बिद्री साखर कारखाना, ऊसाचे गुऱ्हाळ , आदमापूर बाळूमामा मंदिर, दाजीपूर ( अभयारण्य ) अशा प्रकारची ऐतिहासिक, शैक्षणिक व भौगोलिक स्थळे दाखवण्यात आली. त्यावेळी ९ शाळांच्या सर्व मुलांनी अत्यंत आनंदाने हा शैक्षणिक अभ्यास दौरा पूर्ण केला असून जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या उपक्रमाबद्दल आभार मानले आहेत. अभ्यास दौऱ्यामध्ये शेर्पे साळीस्ते केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, सर्व शिक्षा अभियानचे सचिन तांबे , स्वप्नाली बेळणेकर , अनिल खोत, जगदीश गोसावी,  संतोष माने, सुनिल तांबे, कृष्णा सावंत , प्रतिभा कोतवाल , अपूर्वा सावंत आणि चंद्रलेखा नाईक यांनी सहभाग घेतला होता.
              या दौऱ्यामध्ये सर्व मुलांनी मुलाखत, चर्चा, नोंदवही इत्यादींच्या माध्यमातून माहितीचे संकलन करून अभ्यास दौरा खऱ्या अर्थाने यशस्वी केला. या योजनेंतर्गत सहलीचा लाभ दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी शासनाचे आभार मानले आहेत.

           
           

कणकवली नाभिक सभा २९ फेब्रुवारी रोजी होणार

कणकवली दिनांक : २८/०२/२०२० :
                नुकताच सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचा मेळावा कणकवलीत हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. त्यावेळी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांची मुख्य उपस्थिती होती. हा मेळावा उत्तम रीतीने संपन्न केल्याबद्दल व काटेकोर नियोजनाबद्दल जिल्हा व कणकवली तालुक्याच्या वतीने सर्व नाभिक स्वयंसेवकांचा आठवण भेट देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शनिवार दिनांक २९ फेब्रुवारी रोजी अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी ' आभार प्रदर्शन व सन्मान सभा ' संपन्न होणार आहे. तरी दुपारी ठिक अडीच वाजता कणकवली तालुक्यातील सर्व नाभिक बांधवांनी सदर सभेला वेळेवर उपस्थित राहून आपला सन्मान स्वीकारावा अशी नम्र विनंती जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर व तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत चव्हाण यांनी केली आहे.
               वधू- वर मेळावा संपन्न होत असताना विविध समित्या नेमून प्रत्येकाला नियोजनपूर्वक कामांची विभागणी करून देण्यात आली होती. नेटक्या नियोजनामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून उपस्थित झालेल्या नाभिक ज्ञाती बांधवांनी कणकवली तालुका नाभिक संघटनेचे विशेष कौतुक केले होते. मान्यवरांनी सर्व स्वयंसेवकांचे आभार मानले असले तरी कणकवली संघटना आपल्या सर्व बांधवांना एक अविस्मरणीय आठवण भेट देऊन त्यांच्या कार्याचा छोटेखानी सन्मान करणार आहे. सन्मान सभेनंतर सभेच्या ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी कणकवली तालुक्यातील सर्व सलून चालक- मालक- कारागीर यांनी आपली दुकाने सभा कालावधीमध्ये बंद ठेवून आपल्या संघटनेच्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन कणकवली तालुका नाभिक संघटनेचे सचिव प्रवीण कुबल यांनी केले आहे. 

Wednesday, February 26, 2020

शेर्पे साळीस्ते केंद्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

वारगाव दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० :
          शेर्पे साळीस्ते संयुक्त केंद्रांतर्गत संपन्न झालेला आदर्श शिक्षक प्रदान सोहळा म्हणजे माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण असून हा कौतुक करणारा भावनिक सोहळा सर्व शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणारा आहे. सर्व शिक्षक अत्यंत मेहनतीने शैक्षणिक काम करत आहेत, त्यामुळे सर्व जिल्ह्याचे लक्ष तळेरे प्रभागाकडे लागून राहिलेले आहे. शिक्षक राबवत असलेले विविधांगी उपक्रम आम्हा अधिकाऱ्यांनाही अधिक कार्य करण्याचे स्फुल्लिंग देतात. शिक्षकहो, तुम्ही आम्हाला बळ देता , म्हणून हा शैक्षणिक गोवर्धन पर्वत उचलण्याची शक्ती आमच्यात निर्माण होते, असे हृदय उदगार तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी वारगाव नं. १ शाळेत व्यक्त केले.
           वारगाव नं. १ शाळेमध्ये शेर्पे व साळीस्ते केंद्राची या वर्षाची ६ वी शिक्षण परिषद संपन्न झाली. त्यावेळी दिपप्रज्ज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते शिक्षण परिषदेचे उदघाटन करण्यात आले. वारगाव नं.१ शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास कुलकर्णी , उपाध्यक्ष तेली , केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , दशरथ शिंगारे, सखाराम खरात, कल्पना सावंत , सत्यवान घाडीगावकर आणि शेर्पे- साळीस्ते केंद्रातील बहुसंख्य शिक्षकवृंद उपस्थित होते.
           सद्गुरू कुबल म्हणाले, यंदा दोन्ही केंद्रातील पुरुष शिक्षक व स्त्री शिक्षिका यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन करण्यात आलेला गौरव हा त्यांच्या कामाचे फलित आहे. यापुढे अधिक जोमाने शैक्षणिक कार्य करण्यासाठी प्रयत्न करा. सर्व शिक्षक अतिशय उत्साहाने काम करत आहात, त्यामध्ये तंत्रस्नेही पद्धतीने अधिक कार्यक्षम व्हा, असे मौलिक मार्गदर्शन  त्यांनी केले.
           ब्लॉग कसा तयार करावा याचे मार्गदर्शन शिडवणे नं. १ शाळेचे पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल यांनी केले. त्यानंतर शेर्पे केंद्रमुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांनी आपली यशोगाथा सांगितली. त्यात त्यांनी सुंदर मी होणार, माझी प्रेरणादायी शाळा, नवोपक्रम, कृतिसंशोधन , मी कसा दिसतो, खाद्यजत्रा, ग्रामीण घरगुती उद्योगांचे जतन , दत्तक विद्यार्थी, मी कोण होणार इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला. केंद्रप्रमुख कुबल यांनी प्रशासकीय मार्गदर्शन केले.
            त्यानंतर केंद्रातील शिक्षकांना शाल, श्रीफळ आणि आकर्षक सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तळेरे नं. १ च्या शिक्षिका स्मिता कदम, शेर्पे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे , साळीस्ते केंद्रमुख्याध्यापक सत्यवान घाडीगावकर , वारगाव नं. १ शाळेच्या मुख्याध्यापिका ऋजुता जंगले आणि सर्व शिक्षकवृंद यांना गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
           शशिकांत तांबे ( दारुम नं. १ ) , सीताराम पारधिये ( साळीस्ते नं. १ ), अमोल भंडारी ( शेर्पे ), सीमा वरुणकर ( शिडवणे नं. १ ) , स्वप्नाली बेळणेकर ( तळेरे नं. १ ) यांना यंदाचा केंद्रांतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सेंद्रिय परसबाग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल शिडवणे कोनेवाडी शाळेतील सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
          तळेरे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे आणि शेर्पे साळीस्ते केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांचाही मुख्याध्यापकांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन केंद्रांतर्गत सत्कार करण्यात आला. LFW अंतर्गत इंग्रजी विषयात विशेष सहभाग घेतल्याबद्दल माधवी बुचडे व कांता पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्ती अमोल भंडारी , बेळणेकर , सीमा वरुणकर , सीताराम पारधिये, सत्यवान घाडीगावकर , सद्गुरू कुबल यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीराम विभुते यांनी उत्कृष्टपणे केले. अनिल खोत यांनी आभार मानले.