Friday, March 26, 2021

रविंद्र शेट्ये यांजकडून शिडवणे नं. १ शाळेला देणगी

शिडवणे  : दिनांक : २६ मार्च २०२१ :

            सध्या कोविड १९ अंतर्गत शाळांमध्ये कोविड नियमावलीचे पालन केले जात आहे. थर्मल गन , ऑक्सिमीटर अशा साधनांद्वारे मुलांची प्राथमिक तपासणी करूनच मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर इत्यादी बंधनकारक असल्याने मुलांना याची सवय लागावी म्हणून शिडवणे नं. १ शाळेला ग्रामपंचायत शिडवणे यांजकडून ऑक्सिमीटर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गावातील शिक्षणप्रेमी देणगीदार रविंद्र शेट्ये यांनी शाळेला दोन सॅनिटायझर स्टॅन्ड भेट स्वरूपात दिले आहेत. 

            नुकत्याच शाळेत झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत देणगीदार रविंद्र शेट्ये यांनी शाळेला दोन  सॅनिटायझर स्टॅन्ड देऊन कोविड प्रतिबंधासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. त्याबद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आभार मानण्यात आले. 

            त्यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश रांबाडे , उपाध्यक्षा अनिता कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल पांचाळ , मुख्याध्यापक सुनिल तांबे, शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे, निलेश टक्के, रामचंद्र पाटणकर, सुप्रिया पाष्टे , सुजाता कुडतरकर आणि शुभांगी गोसावी उपस्थित होते. 



























Saturday, March 20, 2021

जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी आपला अधिकारी झाला पाहिजे : दिलीप तळेकर

 तळेरे प्रभागस्तरीय गुणगौरव समारंभ २०२१

शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांच्या सौजन्याने सन्मानपत्र व सन्मानचिन्हांचे वितरण

तळेरे : दिनांक २० मार्च २०२१ ( प्रवीण कुबल

          आदर्श शाळा तळेरे नं . १ येथे  '  तळेरे प्रभागस्तरीय गुणगौरव समारंभ सन २०२० -  २०२१ ' चे आयोजन  ' करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन कणकवली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर म्हणाले , " तळेरे प्रभागातील सर्व शिक्षक विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत. त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे ,  केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल , संजय पवार हे स्वतः उपक्रमशील आहेत. त्यांनी कोविड कालावधीत ' शिक्षण आपल्या दारी '  या कणकवली पंचायत समितीच्या उपक्रमांतर्गत विशेष मेहनत घेऊन शाळा बंद असली तरी शिक्षण सुरू ठेवले होते. सर्व शिक्षकांनीही विद्यार्थी हित लक्षात घेऊन अध्यापनाचे कार्य केले होते. शाळा सुरु झाल्यानंतर ' माझी शाळा  , माझा किल्ला ' या नवोपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे ही उल्लेखनीय बाब आहे. शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गही सुरु आहेत. यामधूनच आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी पुढे UPSC / MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांना बसावा व अधिकारी होऊन आपल्या जिल्ह्यात यावा अशी इच्छा माजी सभापती दिलीप तळेकर यांनी व्यक्त केली. 

          त्यावेळी व्यासपीठावर तळेरे सरपंच साक्षी सुर्वे , उपसरपंच दिनेश मुद्रस, तळेरे बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , शेर्पे व खारेपाटण केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल , कासार्डे व साळिस्ते केंद्रप्रमुख संजय पवार , शिक्षणप्रेमी प्रवीण पाताडे, बीट मुख्याध्यापिका करंदीकर  उपस्थित होते. 

          कार्यक्रमामध्ये ४० शिक्षकांचा सन्मानचिन्ह , सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. पटनोंदणी पुरस्कारप्राप्त शिक्षक , माझी शाळा माझा किल्ला स्पर्धेत प्रथम, द्वितीय , तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. नवोदय व शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना सोनाटाचे सोनेरी मनगटी घड्याळ भेट देण्यात आले. उमेद फाऊंडेशन च्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख करुन त्यांना धन्यवाद दिले. सेवानिवृत्त शिक्षक , योगशिक्षक , उत्तम निवेदक , उत्तम अभिलेखे ठेवणारे मुख्याध्यापक , उपक्रमशील मुख्याध्यापक , उपक्रमशील पदवीधर शिक्षक , टॕग समन्वयक, उपक्रमशील शिक्षक , जिल्हास्तरावर क्रीडा स्पर्धेत सहभागी शाळा, सेंद्रिय शेती व परसबागेत विशेष कार्य करणाऱ्या शाळा यांचाही मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. 

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास पाताडे यांनी केले. सुत्रसंचालन श्रीराम विभुते तर आभार प्रदर्शन जान्हवी परब यांनी केले. सद्गुरु कुबल , संजय पवार , सावंतबाई , साक्षी घाडीगांवकर यांनी मनोगते व्यक्त केली. खारेपाटण नं. १ शाळेची तालुक्यातील अत्युत्कृष्ट शाळा म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रभागातील शिक्षकवृंद उपस्थित होते. कोविड नियमावलीचे पालन करुन समारंभ संपन्न झाला. सन्मानचिन्ह , प्रमाणपत्रे व पारितोषिक भेटींचे प्रायोजक तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे हे स्वतः असल्याबद्दल प्रभागाच्या वतीने त्यांना  धन्यवाद देऊन सत्कार  करण्यात आला. एवढया चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्व मान्यवर व शिक्षकवृंद यांनी आयोजकांचे कौतुक केले.