Saturday, December 28, 2019

टॅग मिटिंग देते इंग्रजी बोलण्यासाठी प्रेरणा : गोविंद वावदाणे

साळीस्ते : दिनांक : २८ डिसेंबर २०१९ :
          इंग्रजी ही आपली ज्ञानभाषा आहे. मराठी शाळेत इंग्रजी शिकवताना ती तृतीय भाषा म्हणून शिकवली जाते. तेजस उपक्रमांतर्गत इंग्रजी भाषेचा अधिक सराव व्हावा हा उद्देश ठेवून शासनाने गेल्यावर्षीपासून शिक्षकांची ' टॅग मिटिंग ' सुरु केली. त्यात प्राथमिक शाळेतील १ ते ५ चे एक व १ ते ८ चे २ शिक्षक मिटींगला येत असत. टॅग मिटिंग मध्ये घेतलेले उपक्रम शिक्षकांना वर्गाध्यापनात उपयोगी पडत असत. या महात एकूण १० मिटिंग पूर्ण होत असून ज्या शिक्षकांच्या १० मिटिंग पूर्ण झालेल्या असतील त्यांना शासनाकडून प्रमाणपत्र मिळणार आहे.
          अशा या टॅग मिटींगच्या माध्यमातून अनेक शिक्षकांना इंग्रजीबद्दल वाटणारी भीती कमी झाल्याचे दिसून आले आहे. कारण या टॅग मीटिंगमध्ये एक आत्मविश्वास मिळतो कि आपणही न घाबरता इंग्रजी बोलू शकतो. म्हणूनच टॅग मिटिंग शिक्षकांना पर्यायाने विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्यासाठी प्रेरणा देते असे प्रतिपादन शेर्पे- साळीस्ते - खारेपाटण केंद्राचे टॅग समन्वयक गोविंद वावदाणे यांनी साळीस्ते नं. १ शाळेत केले.
           त्यावेळी शेर्पे- साळीस्ते केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल म्हणाले, गोविंद वावदाने यांनी टॅगच्या १० सभा अगदी नियोजनपूर्वक घेतल्या असून त्यांनी इंग्रजी बोलण्याचा धरलेला आग्रह बरोबर आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या विद्यार्थ्यांना सक्षम बनवले पाहिजे. मुलांनी स्पर्धा परीक्षांमध्ये कमी पडू नये याची आपण शिक्षक म्हणून अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सर्वजण प्रयत्न करतच आहेत, तरीही अधिक जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपला विद्यार्थी स्पर्धेत टिकावा अशी तयारी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
          तळेरे नं. १ शाळेच्या उपशिक्षिका  बेळणेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. साळीस्ते नं. १ शाळेच्या पदवीधर शिक्षिका बुचडे यांनी वेलकम प्रतिज्ञा घेतली. गोविंद वावदाने यांनी नियोजनाप्रमाणे सर्व तासिका घेतल्या. वाचन, आकलन, काळ, उपवाक्य इत्यादी बाबींवर भर देत त्यांनी चर्चा करत प्रात्यक्षिक स्वरूपात सर्व मुद्द्यांचे स्पष्टीकरण केले. सर्व उपक्रमांमध्ये सर्व शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. तळेरे औदुंबर शाळेच्या उपशिक्षिका साळुंखे यांनी सर्वांचे इंग्रजीत आभार मानले.

































Friday, December 27, 2019

शाळा हे माझ्यासाठी दुसरे घरच आहे : दिलीप तळेकर

तळेरे : दिनांक : २७ डिसेंबर २०१९ :
          सर्वांच्या प्रेमामुळेच मला सभापतीपद लाभले आहे. शाळा हे माझे दुसरे घरच आहे. शिक्षकांनी केलेला सत्कार हा मला आनंद देणारा आहे. शिक्षकांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेत  शिकणारी मुले स्पर्धा परीक्षेत अधिक यशस्वी होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे मौलिक मार्गदर्शन  कणकवली तालुक्याचे नवनिर्वाचित सभापती दिलीप तळेकर यांनी सत्काराला उत्तर देताना केले. तळेरे प्रभाग म्हणजे माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे. त्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शिक्षकांच्या व शाळांच्या समस्या प्राधान्याने पूर्ण करण्याकडे मी अधिक लक्ष देईन. तरीही शिक्षकांनी आपापली जबाबदारी सजगतेने पार पाडावी. 
          तळेरे प्रभागाच्या शेर्पे, साळीस्ते , खारेपाटण व कासार्डे या चारही केंद्रांच्या वतीने नवनिर्वाचित सभापती दिलीप तळेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हृदय सत्कार करण्यात आला. त्यावेळी तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , शेर्पे- साळीस्ते केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार , खारेपाटण केंद्रप्रमुख नारायण ओटवकर , उच्चश्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षक उपस्थित होते.
          शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे म्हणाले , तळेरे प्रभागाला दिलीप तळेकर यांच्या रूपाने एक शिक्षणप्रेमी सभापती लाभलेले आहेत. आपल्या तळेरे प्रभागातील शिक्षकांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांनी दिलेली जबाबदारी आम्ही जास्तीत जास्त जिद्दीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
          सभापती दिलीप तळेकर यांच्या शुभहस्ते तळेरे प्रभागातील विजेत्या शाळांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तालुका कणकवलीची जनरल चॅम्पिअनशिप तळेरे प्रभागाला मिळाल्याबद्दल सभापतींनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
          सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन सीताराम पारधिये यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीराम विभुते यांनी केले.