Wednesday, October 16, 2019

शिक्षण परिषद म्हणजे खरे शिक्षण मंथन : सुहास पाताडे

साळीस्ते : दिनांक : १५ ऑक्टोबर २०१९ :
        साळीस्ते केंद्राची शिक्षण परिषद ऑक्टोबर महामध्ये शाळा वारगाव नं.३ शाळेत अत्यंत उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी तरेळे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे, केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , समग्र शिक्षा अभियान कणकवलीच्या विषयतज्ज्ञा दळवी, पाळेकर आणि साळीस्ते केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. 
          पहिल्या तासिकेमध्ये वारगाव नं. ३ च्या उपशिक्षिका म्हाडेश्वर यांनी अध्ययनस्तर निश्चिती व कृती आराखडा या विषयावर तपशीलवार मार्गदर्शन केले. अध्ययन स्तर म्हणजे काय ? निश्चिती केव्हा करणार ? याची पीपीटी सादर करून चर्चा घडवून आणली. त्यामध्ये शिक्षकांना ज्या समस्या येतात त्यावर सुहास पाताडे यांनी शंकांचे उदाहरणासह निरसन केले.
          दुसऱ्या तासिकेमध्ये अध्ययन निष्पत्ती यावर आधारित प्रश्न निर्मिती कशी करावी याबाबत विवेचन करण्यात आले. ४ थी मराठी विषय घेऊन त्यातील चित्रे देऊन त्यावर प्रश्न निर्मिती करण्यात आली. गणित विषयातील सरळव्याज या घटकावर उदाहरणे बनवण्यात आली. परिसर अभ्यास , इंग्रजी या विषयांवरील प्रश्न तयार करताना कोणती काळजी घ्यावी यावर चर्चा करण्यात आली. शिक्षकांनी घेतलेल्या सक्रिय सहभागाबद्दल उपस्थित अधिकारी वर्गाकडून विशेष समाधान व्यक्त करण्यात आले. 
           दिनेश जंगले यांनी आभार मानले.
  
           
          

Tuesday, October 15, 2019

शिडवणे नं . १ शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा

शिडवणे : दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ :
          भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ' वाचन प्रेरणा दिन ' म्हणून साजरा  जातो. या दिवशी सर्व शाळा महाविद्यालयांमधून मुलांना वाचनासाठी उद्युक्त केले जाते. ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ दिंडी, प्रकट वाचन स्पर्धा , पुस्तक परीक्षण इत्यादी विविध उपक्रम राबवून मुलांना वाचनाची गोडी निर्माण केली जाते. 
          शिडवणे नं. १ शाळेत या दिवशी सर्व मुलांकडून पाठ्यपुस्तकांमधील आदर्श उताऱ्यांचे वाचन करून घेण्यात आले. परिपाठाच्या वेळी सर्व मुलांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रार्थनेने प्रारंभ केला. ६ वी च्या मराठी पाठ्यपुस्तकातील  डॉ. कलाम यांनी लिहिलेला गद्य पाठ ' डॉ. कलाम यांचे बालपण ' याचे वाचिक अभिनयासह प्रकटवाचन करण्यात आले. सर्व ६६ मुलांनी या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला. प्रकट वाचन करत ' यापुढेही दररोज नवनवीन वाचन करत राहू ' असे वचन दिले. 
          त्याचप्रमाणे १५ ऑक्टोबर हा दिवस सगळीकडे ' आंतरराष्ट्रीय हातधुवा दिवस ' म्हणूनही साजरा केला जातो. त्याप्रमाणे सर्व मुलांना शाळेतील उपशिक्षक प्रवीण कुबल, सुजाता कुडतरकर व सीमा वरुणकर यांनी प्रात्यक्षिकासह हात कसे धुवावेत ते समजावून सांगितले. गाण्यांचा वापर करत मुलांनीही मनोरंजनात्मक पद्धतीने त्याही उपक्रमामध्ये सहभाग घेतला. 














          

Friday, October 11, 2019

मानसशास्त्रीय दृष्टीकोन ठेवून अध्यापन केल्यास मुले सहज शिकतात : नागेश बुकम

शिडवणे : दिनांक : ११ ऑक्टोबर २०१९
          त्रिपुरा फाऊंडेशन इंडिया संस्थेच्या वतीने फोनेमिक इंटेलिजेंस प्रोग्राम ( PI  ) अंतर्गत संस्थापक डॉ. भास्करन पिल्लई यांच्या संकल्पनेतून साकार करत असलेल्या मानसशास्त्रीय शैक्षणिक प्रयोगासाठी शिडवणे नं.१ शाळेची निवड करण्यात आली आहे. त्यावेळी शाळेत आलेले सदर कार्यक्रमाचे PI प्रशिक्षक नागेश बुकम विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. ते म्हणाले, आज विद्यार्थी विविध आकर्षणांना सामोरे जात असताना त्यांच्या अभ्यास लक्षात राहत नाही. अभ्यास स्मरणात राहणे हे आजच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट बनलेली आहे. त्यासाठी मानसशास्त्रीय प्रयोगांचा आधार घेत आपण मुलांवर योग्य प्रकारे संस्कार केले तर मुलांना सोपे जाईल.
          नागेश बुकम यांनी सांगितले कि, त्रिपुरा फाऊंडेशन इंडिया या संस्थेने मुलांच्या विकासासाठी एक नवे पाऊल उचलले आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यामध्ये काही शाळांचीच निवड करण्यात आलेली आहे. शिडवणे शाळेतील मुलांना या अध्यापनाचा लाभ त्यानिमित्ताने मिळणार आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे.
          हा उपक्रम वर्षभर चालणार असून विद्यार्थ्यांची लेखी , तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. या सर्व मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग मुलांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी होणार आहे. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांवर व शिक्षकांवरही प्रयोग करून प्रात्यक्षिके करून घेतली. मुले या विविध प्रयोगांमध्ये छान रमली होती. इयत्ता १ ली ते ७ वी च्या सर्व ६६ मुलांवर सदर प्रात्यक्षिके घेण्यात आली.













शिडवणे नं. १ शाळेत जागतिक अंडी दिन साजरा

शिडवणे : दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ :
                   '  संडे हो या मंडे रोज खाओ अंडे  ' असे म्हटले जाते . दररोज अंडी सेवन केल्यामुळे त्यामधून आपल्याला उच्च दर्जाचे प्रोटिन्स मिळून आपले पोषण सुधारते, हा एकमेव उद्देश जागृत करण्यासाठी जागतिक अंडी दिन साजरा केला जातो. शिडवणे नं .१ शाळेतही या दिनाचे औचित्य साधून ' जागतिक अंडी दिन ' साजरा करण्यात आला.
                    शाळेतील सर्व मुलांना अंडी सेवनाचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगण्यात आले. वारगाव पशुधन पर्यवेक्षक करंबेळकर  यांच्या सौजन्याने शिडवणे नं .१ शाळेतील सर्व मुले, अंगणवाडीतील मुले अशा प्रकारे  एकूण ८० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना उकडलेली अंडी देऊन लाभ देण्यात आला.
                    त्यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शालेय पोषण आहार ताई, अंगणवाडीताई , विद्यार्थी आणि अंगणवाडीतील चिमुकली मुले उपस्थित होती. सर्व मुलांनी भोजनाच्या वेळी मिळालेल्या उकडलेल्या अंड्यांचे सेवन करताना आनंद व्यक्त केला. शाळेच्या वतीने अंडी देणगीदार पशुधन पर्यवेक्षक करंबळेकर यांचे आभार मानण्यात आले.