Monday, January 27, 2020

माझा सन्मान हा शिडवणे गावातील प्रत्येकाचा सन्मान आहे : वित्त व बांधकाम सभापती रविंद्र ( बाळा ) जठार

शिडवणे : दिनांक : २६ जानेवारी २०२० :
          मी माझ्या शिडवणे गावातील लोकांच्या सदिच्छांमुळे सभापती पदापर्यंत पोहोचू शकलो आहे. आपण ग्रामपंचायतीच्या व शाळेच्या वतीने माझा जो सत्कार व सन्मान केलात त्याने मी भारावून गेलो आहे. माझा जिल्ह्यात होणारा सन्मान हा माझा एकट्याचा नसून तो शिडवणे गावातील माझ्या लोकांच्या प्रेरणेमुळे मिळालेला सन्मान असून तो शिडवणे गावातील प्रत्येक नागरिकाचा सन्मान आहे , असे उद्गार सत्काराला उत्तर देताना कार्यक्रमाचे उदघाटक जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार यांनी शिडवणे नं. १ शाळेच्या स्नेहसंमेलनात उदघाटनप्रसंगी व्यक्त केले.
          त्यावेळी कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, शिडवणेने केलेला माझा हृदय सत्कार  माझी जबाबदारी वाढवणारा आहे. तुमच्या गावातील समस्या सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. व्यासपीठावर शिडवणे गावाच्या सरपंच शीतल जाधव, उपसरपंच दिपक पाटणकर, रविंद्र शेट्ये, वारगाव हायस्कुलचे मुख्याध्यापक वाळकेसर , मंगेश शेट्ये, गोरक्षनाथ गायकवाड, स्नेहल राणे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश रांबाडे, उपाध्यक्षा सुजाता शेट्ये आणि गावातील प्रतिष्ठित, शिक्षणप्रेमी पदाधिकारी, पालक, शेर्पे केंद्रातील शिक्षक, माजी विद्यार्थी ,आजी विद्यार्थी व बहुसंख्य ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. माजी शिक्षक गोरक्षनाथ गायकवाड व स्नेहल राणे या शिक्षकांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. खोखो प्रशिक्षक सुशांत तांबे यालाही भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. खोखो जिल्हास्तर उपविजेता झालेल्या मोठ्या गटातील मुलींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
          प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेने हळदीकुंकू समारंभाचे व उत्कर्षा उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी मंगेश शेट्ये यांच्या सौजन्याने सर्व महिलांना २०० कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. उत्कर्षा समुपदेशिका सुजाता कुडतरकर, सीमा वरुणकर यांनी महिलांना ' मासिक पाळी व्यवस्थापन ' या विषयावर मार्गदर्शन केले.
          महेश शेट्ये यांच्या सौजन्याने शाळेला इन्व्हर्टर प्रदान करण्यात आला. त्याचे समारंभपूर्वक उदघाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. शाळेला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे प्रसंगानुरूप पुष्प देऊन आभार मानण्यात आले. शाळेने २८ सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षकांचे आभार मानण्यात आले. दिपक पांचाळ यांच्या आर्थिक सहकार्यातून प्रतिवर्षाप्रमाणे मंडप व ध्वनिक्षेपक याची मोफत सेवा देत असल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी केले. तर आभार प्रवीण कुबल यांनी मानले.
          

Wednesday, January 22, 2020

शिडवणे शाळा नंबर एकचे २६ जानेवारीला स्नेहसंमेलन संपन्न होणार

शिडवणे : दिनांक : २३ जानेवारी २०२० :
          प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी रविवारी दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी सिंधदुर्ग जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार , कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर, पंचायत समिती सदस्या तृप्ती माळवदे , शिडवणे सरपंच शीतल जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश रांबाडे, तळेरे प्रभागाचे शिक्षण  विस्तार अधिकारी सुहास पाताडे, केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
          सकाळी ठिक आठ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम , दुपारी २ वाजता हळदीकुंकू समारंभ, महिला मेळावा, फनीगेम्स, सायंकाळी ठिक सात वाजता उदघाटन समारंभ, मान्यवर व माजी शिक्षकांचा सत्कार , रात्री ८. ०० वाजता मुलांचे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
           तरी सदर कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेत मुलांना प्रोत्साहन द्यावे , अशी नम्र विनंती शालेय स्वराज्य मंडळाचे सांस्कृतिक मंत्री कु. आर्यन चव्हाण , शालेय मुख्यमंत्री कु. सुयश शेट्ये , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रांबाडे आणि शिडवणे नं. १ शाळेचे मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी केली आहे.

खाद्यजत्रा हा उपक्रम मुलांना व्यावसायिक दृष्टीकोन देतो : रविंद्र जठार यांचे शेर्पे खाद्य महोत्सवात प्रतिपादन

शेर्पे : दिनांक : २२ जानेवारी २०२० :
          आपली मालवणी खाद्यसंस्कृती सगळीकडे प्रसिद्ध आहे. मोदक, लाडू, आप्पे, पुरणपोळ्या, भजी, साखरेची कापे, नारळाच्या वड्या इत्यादी खाद्यपदार्थ खवैयांना आवडणारे आहेत. असे विविध खाद्यपदार्थ बनवून ते विकल्यास चांगली कमाई होऊ शकते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनाही आर्थिक उलाढाल, बाजार , हिशेब इत्यादी गोष्टींची सवय लागते. असे खाद्यजत्रेसारखे उपक्रम राबवल्यास मुलांचा व्यावसायिक दृष्टीकोन तयार होऊन त्यांना भावी जीवनात यशस्वी व्यापारी होण्यासाठी सहाय्य्यभूत ठरेल , असे मत जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार यांनी शेर्पे नं. १ शाळेच्या खाद्यजत्रा महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
           कार्यक्रमाचे उदघाटन रविंद्र जठार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी पंचायत समिती सदस्या तृप्ती माळवदे , शेर्पे सरपंच निशा गुरव, उपसरपंच विलास पांचाळ, शेर्पे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष शेलार, शेर्पे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अत्तारसर , शेर्पे केंद्रातील शिक्षकवृंद , शेर्पे शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे, पाककृती बनवून आणलेले विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होते.
           अमोल भंडारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दशरथ शिंगारे यांनी प्रास्ताविक केले. मुलांना स्वतः पदार्थ बनवून ते विकता यावेत आणि त्या माध्यमातून अर्थार्जन करण्यासाठीचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला. शाळेत मुलांनी उभारलेल्या खाद्य स्टॊलना विविध राज्यांची नावे देण्यात आली होती. शेंगदाणा लाडू, रव्याचे लाडू, चुरमुऱ्याचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू, नारळाच्या वड्या , उकडीचे मोदक, पाणीपुरी, शेवपुरी, गोबी मंचुरियन , ढोकळा, ओली भेळ, सुकी भेळ, शेव लाडू, भजी , घावणे, मसाले ताक , चहा, खुसखुशीत कांदाभजी, खजुरी, गोड इडली, मसाले दूध, लिंबू सरबत, चिंच गोळा , पुरणपोळ्या, करंज्या, गुलाबजामून, मालपुवा, मुळ्याची भाजी, चायनीज  भेळ, कलिंगड भेस, तिखट इडली, गोड अप्पे , कानवले इत्यादी विविधांगी खाद्यप्रकारांनी रंगत आणली होती. खाद्यजत्रेला आलेल्या मुलांनी , पालकांनी , पदाधिकाऱ्यांनी सदर पदार्थांची चव घेत घेत छान मजा घेतली. खरेदी करताना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आपणही भावी व्यापारी बनू शकतो हा विश्वास मुलांनी मोठ्यांच्या  मनात निर्माण केला.
           या कार्यक्रमाचे औचित्य साधून ' रंगोत्सव ' स्पर्धेच्या यशस्वी मुलांना प्रशस्तीपत्र, चषक व मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक गौरविण्यात आले. मान्यवरांनी आपल्या मनोगतात शेर्पे शाळेच्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.












































Monday, January 20, 2020

शिक्षक समितीचा जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा उपक्रम स्तुत्य : रविंद्र जठार

कणकवली : दिनांक : २१ जानेवारी २०२० :
          महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या माध्यमातून अत्यंत स्तुत्य असे शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. मुलांनी स्पर्धेत अधिक यश संपादन करण्याच्या दृष्टीने शिक्षक समिती मोलाचे सहकार्य करीत आहे. गरीब, गरजू व खेळताना जखमी झालेल्या मुलांना आर्थिक सहकार्य करत शिक्षक समिती जे सामाजिक कार्य करत आहे त्याला तोड नाही. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना सराव परीक्षेच्या माध्यमातून अधिक गुणवत्तेकडे नेण्याच्या प्रयत्नांबद्दल नवनिर्वाचित वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार यांनी सर्व शिक्षक समितीच्या पाईकांचे विशेष कौतुक केले.
          जानवली मारुतीमंदिर शाळेमध्ये जिल्हास्तरीय सराव परीक्षेचा उदघाटन समारंभ संपन्न झाला. त्यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा वित्त बांधकाम सभापती रविंद्र जठार , नवनिर्वाचित कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषद सदस्या श्रिया सावंत, जि. प . सदस्य सुधीर नकाशे, माजी कणकवली सभापती संतोष कानडे , पं. स. सदस्य मनोज रावराणे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, कॉमन पूल विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस , शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे , राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर , राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे , कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव, सचिव सुशांत मर्गज , मारुतीमंदिर च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिशा राणे, सरपंच अमोल राणे , मुख्याध्यापिका चंद्ररेखा नाईक, शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस , केंद्रप्रमुख नितीन कदम, लक्ष्मण वळवी , केंद्रप्रमुख विजय मसुरकर , केंद्रप्रमुख विजय भोगले, किशोर कदम , संतोष जाधव, प्रदीप मांजरेकर, केंद्रप्रमुख के. एम . पवार , सुहास सावंत , आनंद तांबे , शिक्षक समितीचे शिलेदार , पर्यवेक्षक शिक्षक , पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
          दिलीप तळेकर म्हणाले ,  शिक्षक समिती मार्फत घेत असलेली सराव परीक्षा अत्यंत उपयुक्त असून ती शासकीय परीक्षेसारखी गुप्तता पाळून घेतली जाते. आपला जिल्हा राज्यात शैक्षणिक क्षेत्रात दर्जेदार होण्याच्या दृष्टीने समितीचे योगदान अनमोल असेच आहे. त्याबद्दल त्यांनी सर्व शिक्षक समितीच्या शिलेदारांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. आभार प्रदर्शन गिल्बर्ट फर्नांडिस यांनी केले. या दिवशी सिंधदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या सर्व केंद्रावर मुलांच्या भोजनाचीही मोफत सोय शिक्षक समिती व शिक्षकांच्या माध्यमातुन करण्यात आली होती.या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३५०० विद्यार्थी  प्रविष्ठ झालेले असून यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक समितीच्या वतीने समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे.