दुसरा टप्पा: प्रशिक्षण स्थळ : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नांदगाव मधली वाडी
कालावधी: 18 मार्च ते 22 मार्च 2025 : पाच दिवस
मार्गदर्शक: मा. हर्याण सर, मा. मुद्राळे मॅडम आणि मा. राठोड सर
दुसरा टप्पा: प्रशिक्षण स्थळ : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नांदगाव मधली वाडी
कालावधी: 18 मार्च ते 22 मार्च 2025 : पाच दिवस
मार्गदर्शक: मा. हर्याण सर, मा. मुद्राळे मॅडम आणि मा. राठोड सर
🔴 प्रशिक्षणाचा चौथा दिवस
मागील तीन कधी संपून गेले ते समजलंही नाही. आजचा हा चौथा दिवस सुद्धा खूप चांगल्या आंतरक्रियांनी साजरा झाला. जेव्हा प्रशिक्षणांचे प्रत्येक दिवस अशा प्रकारे शैक्षणिक दृष्ट्या साजरे होतात तेव्हाच ते प्रशिक्षण खऱ्या अर्थाने पुढे पुढे जात असते आणि हवेहवेसे वाटत असते. शुक्रवार दिनांक २१ मार्च २०२५ म्हणजेच प्रशिक्षणाचा चौथा दिवस. या दिवशी सर्वच प्रशिक्षणार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेण्याचे महत्त्वाचे कार्य घडले.
सकाळच्या उकाडा होत नसलेल्या रमणीय स्थळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नांदगाव मधलीवाडी शाळेच्या सभागृहात सर्व प्रशिक्षणार्थी यायला सुरुवात झाली होती. पाचच मिनिटांत सर्व वर्ग प्रशिक्षणार्थ्यांनी पूर्ण भरला. आजच्या दिवशी चौथा दिवस आहे , म्हणजे उद्याचा पाचवा दिवस आहे या आठवणीने सर्वांनाच खूप चांगले वाटत होते. चांगले या अर्थाने कि मागील तिन्ही दिवस अतिशय तणावरहित वातावरणात गेले होते. फक्त अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांचा विचार करत दंग असलेले सर्व प्रशिक्षणार्थी पुन्हा एकदा आजही पहिल्या पासूनच सर्व आंतरक्रियांमध्ये सामील होत होते.
प्रवीण कुबल यांनी कालच्या तिसऱ्या दिवसाचे अहवाल वाचन केले. सर्वानाच अहवाल आणि अहवालवाचन खूप आवडले असावे. आज SQAAF या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन होणार होते. SQAAF म्हणजेच शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा . मा. मुद्राळे मॅडम यांनी या महत्त्वाच्या विषयावर अतिशय सखोल मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० , शालेय गुणवत्ता मूल्यांकन , गुणवत्तेचे मूल्यांकन , शालेय गुणवत्ता मूल्यांकन आराखडा , त्याची मार्गदर्शक तत्त्वे , मानके इत्यादींचे प्रोजेक्टरच्या साहाय्याने अतिशय अनमोल माहिती समजावून दिली. काही शंकांचे निरसन राज्यस्तरीय मार्गदर्शकांकडून करुन घेऊन पुनश्च मार्गदर्शन केले. गुणवत्ता मूल्यांकन आराखडा वापरताना कोणत्या गोष्टी करू नयेत कोणत्या गोष्टी कराव्यात यावर चर्चा केली. त्यांनी शालेय गुणवत्ता मूल्यांकन प्रणालीचा उद्देश सांगितला.
प्रारंभिक , प्रगतशील , प्रगत आणि प्रवीण या चार स्तरांचे वर्गीकरण सांगितले. १२८ मानके भरताना कशी भरावी याबाबत अनेक प्रशिक्षणार्थी शिक्षक शिक्षिका यांनी आपले अनुभव कथन केले. क्षेत्र , उपक्षेत्र आणि मानके पातळीवर अनेकांना अनेक प्रश्न उपस्थित झाले. सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न झाला. काही प्रमाणात अजूनही शंका असू शकल्या तर नक्कीच पुढील पातळीवर आपल्या लक्षात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मा. राठोडसर यांनी मूल्यांकन झाल्यानंतर कशा प्रकारे परिशिष्टे १ ते ८ यांची आवश्यकता असणार आहे ते उदाहरणे देऊन स्पष्ट केले. त्यात त्यांनी शालेय बैठका , निर्धारकांसाठी सूचना , शाळा प्रमुख किंवा मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या , माहितीसंग्रह इत्यादींबद्दल माहिती दिली. आपल्याला आपल्या शाळेत निरीक्षणे अंतर्गत पाठ निरीक्षण , पाठ टाचण , परिपाठ , विशेष कार्यक्रम , व्हरांडा , विद्यार्थ्यांच्या कामाचे प्रदर्शन , विशेष कार्यक्रम रेकॉर्ड , मध्यंतर , शालेय पोषण आहार , पिण्याचे पाणी , हात धुण्याची सुविधा , ग्रंथालय , आयसीटी लॅब , खेळाचे मैदान , शौचालये , शालेय दप्तर , परीक्षा विषयक दस्तऐवज , शिक्षक प्रमाणपत्रे , पुरस्कार , लेखी तक्रारी , विद्यार्थी लिखित कामे , अभ्यासक्रम नियोजन , गृहकार्य तपासणी , गृहकार्य / स्वाध्याय यांना शिक्षकांनी दिलेल्या लेखी सूचना , विद्यार्थ्यांच्या पुढील सुधारणेसाठी दिलेले काम इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शाळेमध्ये शालेय सुरक्षा समिती असायला हवी. तसेच त्याचा तक्ता बोर्ड दर्शनी भागात लावायला हवा. तक्रारपेटी आठ दिवसांनी एकदा उघडायला हवी. शक्यतो शनिवारी उघडावी असे पुस्तकात नमूद आहे. त्याचप्रमाणे गणित पेटी , विज्ञानपेटी , सूचना पेटी , प्रश्नपेटी ( प्रश्नपेढी नव्हे ) , अमलीपदार्थ मुक्त शाळा , अग्निशामक यंत्र , CCTV नोंदी , आपत्तीकालीन यंत्रणा , त्यांचे संपर्क क्रमांक , वैद्यकीय सेवा क्रमांक , शिक्षकांचे चारित्र्य प्रमाणपत्र , प्रथमोपचार पेटी , उत्कर्षा प्रशिक्षण आणि त्या संदर्भात द्यावयाच्या सेवा , विद्यार्थी संसद / बालसभा / मंत्रिमंडळ , पालक संपर्क क्रमांक यादी , पालक भेट वही इत्यादी आणि SQAAF संदर्भात ठेवावयाच्या दस्तऐवजांवर चर्चा करण्यात आली.
यानंतर मा. हर्याणसर यांनी ‘ समग्र प्रगतिपत्रक ’ संदर्भात स्तरनिहाय स्वरुप स्पष्ट केले. यामध्ये स्तरनिहाय वेगवेगळी HPC ( Holistic Progress Card ) असणार आहेत. जाणीवजागृती , संवेदनशीलता , सर्जनशीलता या क्षमतांवर कामगिरीचे स्तर तीन प्रकारचे असणार आहेत. प्रवाह , पर्वत आणि आकाश अशी त्या तीन कामगिरी स्तरांची नावे आहेत. शिक्षकांचा प्रतिसाद मध्ये अनेक प्रकारची माहिती वर्णनात्मक पद्धतीने लिहावी लागणार आहे. स्वयंमूल्यांकन , सहाध्यायी मूल्यांकन सुद्धा असणार आहे. तसेच यात एक बाब अत्यंत वेगळी असणार आहे ती म्हणजे पालकांचा प्रतिसाद. पालकांच्या निरीक्षणाप्रमाणे त्यात टिप्पणी असणार आहे. आणखी काही गोष्टी असणार आहेत. ज्या उद्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट केल्या जाणार असल्याचे मार्गदर्शकांनी सांगितले. रुचकर भोजनानंतर आजच्या दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण झाले. समग्र प्रगती पत्रकाची धास्ती घेऊन अजिबात चालणार नाही. तो विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आदर्श आरसा असणार आहे.
🔵प्रवीण कुबल
🔹प्रशिक्षणाचा तिसरा दिवस
गुरुवार दिनांक २० मार्च २०२५ रोजी शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणाचा तिसरा दिवस होता. नांदगाव मधली वाडी शाळेमध्ये अतिशय उत्साहपूर्वक वातावरणामध्ये प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. दोन दिवसांच्या सलग मार्गदर्शनानंतर आज गटकार्य घेण्यात येणार असल्याची कल्पना आधीच प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आली होती. कालच्या दिवसाच्या अहवालाचे वाचन करण्यासाठी आवाहन करण्यात आले. कवी मनाचे शिक्षक मा. संदीप कदमसर यांच्या काव्यमय शब्दांनी अहवालाची सुरुवात झाली. त्यांचे लेखन मला नेहमीच आवडते. त्यांचा प्रभाव कोणावरही लगेच पडेल असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. आणि तसेच झाले. त्यांच्या अहवालाचे वाचन होत असताना वर्गात अगदी शांतता होती. टाळ्यांनीच त्या शांततेचा भंग झाला. त्यांनी अतिशय अप्रतिम लेखन आणि वाचन केले होते. तज्ज्ञ मार्गदर्शकांनीही त्यांचे कौतुक केले.
त्यानंतर मा. मुद्राळे मॅडम यांनी गटकार्य कसे करावयाचे आहे त्याबद्दल कल्पना दिली. प्रोजेक्टरवर एक नमुना दाखवून त्याचे विश्लेषण केले. त्यामुळे गटकार्य नक्की कसे करायला हवे याची प्रशिक्षणार्थी शिक्षकांना कल्पना आली. गट पाडण्यात आले. भाषा ( मराठी ) , भाषा ( इंग्रजी ) , भाषा ( हिंदी ) , गणित , विज्ञान , इतिहास , भूगोल , शारीरिक शिक्षण इत्यादी विषयानुसार गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटात किमान ५ पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींचा समावेश करण्यात आला होता. सर्व गटांनी आपल्याला सोयीप्रमाणे वर्गात गटानुसार बसून घेतले. गटामध्ये ओळखीचे आणि अनोळखी सदस्य , सदस्या होत्या. त्यामुळे प्रत्येकाची त्यांच्याशी गतकऱ्याच्या निमित्ताने ओळख झाली. त्यामुळे शैक्षणिक गप्पा करत करत सर्व गट सदस्यांनी आपले गटकार्य अधिकाधिक चांगले होण्यासाठी सामुहिक योगदान दिले.
प्रत्येक गटाने स्वतःला नाव दिले. त्या नावाने त्यांना आपल्या गटाचे गटकार्य सादर करताना अतिशय आनंद होणार हे निर्विवाद होते. गटकार्य करण्यासाठी प्रशिक्षणार्थींना ठराविक तासांचा वेळ देण्यात आला होता. प्रत्येक सदस्य आपल्या गटात पूर्ण क्षमतेने काम करताना दिसत होते. चर्चा विचार विनिमय करून प्रत्येक गट संघभावनेने आपले गटकार्य करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला मिळत होता. आपल्याला असलेले विषयज्ञान व अनुभव यांच्या साहाय्याने प्रत्येकजण आपले मत मांडत होता. त्यामुळे कच्चे लेखन करुनच त्यानंतर पक्के फायनल करण्याचे प्रत्येक गटाने ठरवले असावे. शेवटी अमृतमंथनच झाले होते. प्रत्येक गटाने केलेली मेहनत फळाला आली होती. दोन दिवस तज्ज्ञ मार्गदर्शकांनी अभ्यासपूर्ण केलेल्या मार्गदर्शनाची खऱ्या अर्थाने फलनिष्पत्ती होताना दिसत होती. आपले प्रशिक्षणार्थी मनोभावे आपले गटकार्य करण्यात दंग असल्याचे पाहून तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या आनंदाला पारावार उरला नसणार यात कोणतीही शंका नाही.
कविवर्य शांताराम नांदगावकर नवनिर्मिती ग्रुप यांनी मराठी विषयाचे गटकार्य अप्रतिम केले. शेक्सपियर गटाने इंग्रजी विषयक गटकार्य इंग्रजीत सादर केले. मा. महादेव मोटे सर यांनी अस्खलित इंग्रजीत सादरीकरण केले. रामानुजन गटाने इयत्ता दहावीच्या पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित गटकार्य केले होते. वारगाव हायस्कुलचे मुख्याध्यापक मा. हनुमंत वाळकेसर यांनी गटाच्या वतीने उत्कृष्ट सादरीकरण केले. मा. प्रियांका सुतार मॅडम यांनी पायथागोरस प्रमेयाची संकल्पना शैक्षणिक साहित्याचा वापर करून स्पष्ट केली. छावा गटाने शिवाजी महाराज , संभाजी महाराज यांच्या घोषणा देत अभिनव पद्धतीने शेर सांगत सुरुवात केली. त्यांच्या गटाचे समाजशास्त्र विषयाचे सादरीकरण अतिशय उत्तम प्रकारे झाले. ‘ वह देश कौनसा है ’ या सहावीच्या कवितेवर आधारित हिंदी गटाने हिंदी भाषेचा वापर करत केलेले सादरीकरण लक्षात राहण्यासारखे होते. त्यात नारकर सरांनी चालीमध्ये कवितेच्या चार ओळी सुस्वर गाऊन दाखवल्या ही आणखी उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल. डी टू स्टार गटाने आपल्या गटाचे नावच हटके ठेवले होते. त्या नावातच त्यांनी पहिल्यांदा कोडे घातले होते. ते शेवटी त्यांनीच सोडवून दाखवले. त्यांनी इयत्ता सातवीच्या विज्ञान विषयातील संयुगे आणि मिश्रणे यांच्या वर्गीकरणावर केलेले गटकार्य अभ्यासपूर्ण असेच होते.
मधल्या वेळेत अल्पोपहार व चहापान झाले. त्यामध्ये आंबोळी व झणझणीत चण्याची उसळ देण्यात आली होती. सर्व तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सादर झालेल्या गटकार्याबद्दल तोंड भरून कौतुक केले. अनेकांनी सेल्फी काढल्या. फोटोसेशन झाले. आजचा दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय असाच होता.
लेखन : प्रवीण कुबल
🟥 प्रशिक्षणाचा दुसरा दिवस
दुसरा दिवस म्हणजे १९ मार्च २०२५. सकाळ सत्रातील प्रशिक्षण आल्हाददायक वातावरणात सुरु झाले. खरंच सकाळची वेळ मुलांसाठीही कितीतरी चांगली असते. आपले अध्यापन ऐकण्यासाठी मुले नेहमीच सकाळ सत्रात जास्त एकाग्र असल्याची जाणवतात. आमच्या प्रशिक्षणाची वेळ सकाळची असल्याने प्रशिक्षणार्थी वेळेवर येऊन उपस्थित होत होते. वर्गाला सुरुवात झाली.
पहिली तासिका ‘ क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना ’ यावर घेण्यात आली. मा. हर्याण सरांच्या तासाने सुरुवात म्हणजे पर्वणीच. त्यांनी आपल्या तासिकेत घटकातील सर्व माहिती व्यवस्थित समजावून दिली. त्यात अध्ययन, अध्यापन, मूल्यांकन, कार्यनीती, प्रश्न प्रकार, प्रश्न निर्मिती कौशल्ये यावर भर देण्यात आला होता. विचार प्रवर्तक प्रश्न देखील बनवून घेण्यात आले. त्यांनी त्यांच्या तासिकेत इयत्ता नववीच्या कुमारभारती पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक १४ व्या आदर्शवादी मुळगावकर या शीर्षकाच्या लेखक गोविंद तळवळकर यांनी लिहिलेल्या पाठाचा संदर्भाने उल्लेख केला आणि सविस्तर गोष्टच सांगितली. ते असेही म्हणाले, “ तुझे आहे तुझ्यापाशी हे वाक्य प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. ” अमीर खानच्या ‘ थ्री इडियट्स ’ या हिंदी चित्रपटातील एक प्रसंगही त्यांनी वर्गात शब्दरूपाने उभा केला. विद्यार्थ्यांमध्ये जर आपण ‘ दुर्दम्य इच्छाशक्ती ’ निर्माण करु शकलो तरच मुले आयुष्यात यशस्वी होताना दिसतील. म्हणून आपल्याला मुलांना खरेखुरे अनुभव द्यावयाचे आहेत. मुलांसाठी आता Holistic Progress Card बनविण्याची जबाबदारीही आपल्यावर येते आहे. मूल्यांकन हे आपण मुलांवर आकारिक आणि संकलित मूल्यमापन करण्याअगोदर जे सुलभक म्हणून काम करणार आहोत ते असणार आहे. त्यानंतर जे असणार ते मूल्यमापन. मुले जसे दररोज नवीन शिकण्यासाठी आसुसलेले असतात, तसेच आपल्यालाही सतत अपडेट राहाणं ही काळाचीच गरज होऊन बसली आहे.
मा. राठोड सरांची तासिका ही समग्र माहितीने युक्त असते. आज सरांनी ‘ क्षमताधारित मूल्यांकनासाठीची कार्यपद्धती शिकविली. त्यात त्यांनी क्षमतांची निश्चिती, अध्ययन निष्पत्ती निश्चिती, मूल्यांकनांचे निकष, मूल्यांकन पद्धती, सप्रमाणता, सुस्पष्ट सुचना, संमिश्र पद्धती म्हणजेच ब्लेंडेड पद्धतीचा वापर, प्रत्याभरण, त्याचा अहवाल, सातत्यपूर्ण सुधारणा या गोष्टींवर प्रकाश टाकला. प्रशिक्षणावर त्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन त्यांनी केले. प्रोजेक्टर वर एक चित्र दाखवून त्या चित्रावर चर्चा करण्यात आली. चित्रांमध्ये प्राणी आणि पक्षी दाखवण्यात आले होते. त्यांच्या शेजारी एक झाड होते. त्याला शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्यांना अशी सूचना दिली होती की, “ सर्वांना एकच एक कृती करायची आहे ती म्हणजे या झाडावर चढायचे आहे. ” अनेक प्रशिक्षणार्थींनी चर्चा घडवून आणली. आपल्या वर्गातही असेच वेगवेगळ्या क्षमतांचे विद्यार्थी असतात. त्या सर्वांकडून आपण एखादी क्षमता झालीच पाहिजे असा आग्रह धरणे हे नक्कीच चुकीचे ठरेल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता वेगवेगळ्या असतात, त्यामुळे यापुढे आपल्याला विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक क्षमतांचाही विचार करायला हवा. राठोड सरांनी क्षमता आधारित मूल्यांकनांची साधने व तंत्रे समजावून सांगितली. त्यामध्ये त्यांनी स्वयं मूल्यांकन प्रश्नावली, प्रत्याभरण सर्वेक्षण, कौशल्य चाचण्या, क्षमता आधारित मुलाखती, कौशल्यातील अंतराचे विश्लेषण, मानसशास्त्रीय चाचण्या, ई - पोर्टफोलिओ, अभिरूप आणि आभासी प्रयोगशाळा याबद्दल सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर मुद्राळे मॅडम यांनी प्रश्नांचे प्रकार समजावून सांगितले. प्रश्न कसे असावे व प्रश्न कसे नसावे याबद्दल चर्चा घडवून आणली. प्रश्नांचे प्रकार सांगितले. प्रत्येक प्रश्न प्रकाराचा उपयोग व उद्देश सांगितला. प्रश्न विचारण्याच्या तंत्राची मूलभूत माहिती सांगितली. अध्ययन अध्यापनामध्ये अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी अचूक प्रश्न प्रकारांचा वापर कसा करावा हेही समजावून सांगितले. अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापनांची माहिती सांगत असताना शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यातील इष्ट बदल असतो हे त्यांनी स्पष्ट केले. अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू असतानाच आपल्याला वेळोवेळी मूल्यांकनाची गरज असते. म्हणूनच मूल्यांकन हे शिक्षण प्रक्रियेचे अविभाज्य अंग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्सनल निर्मिती करताना प्रश्न विचार प्रवर्तक असावेत. पटनांची रचना सुबोध व नेमक्या शब्दात करता आली पाहिजे. प्रश्न निसंदिग्ध व निश्चित स्वरूपाचे असायला हवेत. प्रश्नांची रचना सुद्धा निर्दोष असायला हवी. आपण तयार केलेले प्रश्न प्रमाणित असायला हवेत. प्रश्न विश्वसनीय असायला हवेत आणि त्यामध्ये वस्तुनिष्ठता सुद्धा असायला हवी. निम्नस्तरीय प्रश्न, उच्चस्तरीय प्रश्न आणि पुस्तकासह चाचणी याबद्दलही त्यांनी ऊहापोह केला. स्वनिर्मितीला वाव देणारे प्रश्न आणि विषयानुरूप विचारमंथनासाठीचे प्रश्न याबद्दलही त्यांनी चर्चा घडवून आणली.
त्यानंतर हर्याण सरांनी प्रश्न निर्मिती संदर्भात समस्या आणि प्रश्न, सर्व शोध हे प्रश्नातून निर्माण होत असतात, प्रश्न असे हवे जे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे असतात यावर भाष्य केले. त्यांनी प्रश्न निर्मितीचा ओघ तक्ता समजावून सांगितला. त्यासाठी पहिल्यांदा क्षमता निश्चिती करायला हवी. त्यानंतर क्षमता विश्लेषण करून अध्ययन निष्पत्तींची निश्चिती करायला हवी. शिकवून शिकता येत नाही, मुलांना नकळत शिकवता आलं पाहिजे. मुलांनी स्वतः शिकण्याची इच्छा व्यक्त केली पाहिजे अशा प्रकारचं वातावरण आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे. मुलाने जर ठरवलं की मला शिकायचं आहे तरच तो शिकू शकतो. हा आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम शिक्षक म्हणून आपल्याला करायचं आहे. विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्वरूपाची इच्छाशक्ती जागृत करण्याचं काम शिक्षकाने करायला हवं. त्यावेळी त्यांनी अर्जुनाचे आणि एकलव्याचे उदाहरण देऊन प्रबळ इच्छाशक्ती असल्यास मुले स्वयंअध्ययनाने सुद्धा शिकू शकतात हे स्पष्ट केले.
आजचा दिवस सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सर्व प्रशिक्षणार्थी व तज्ञ मार्गदर्शक यांच्यासाठी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाला. सर्व तज्ञ मार्गदर्शक यांचे खूप खूप आभार.
लेखन : प्रवीण कुबल
🔴 प्रशिक्षणाचा पहिला दिवस
मंगळवार दिनांक १८ मार्च २०२५ रोजी ‘ शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २. ० ’ च्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाला सुरुवात झाली. आज प्रशिक्षणाचा पहिला दिवस होता. बरोबर नियोजनाप्रमाणे सकाळ सत्रात प्रशिक्षणाला सुरुवात झाली होती. आमचे मार्गदर्शक आधीच आमची वाट पाहत असलेले दिसले. त्यांनी आपली तयारी सुरु केली होतीच. व्यासपीठावर वरिष्ठ शिक्षकांना बसण्यासाठी विनंती करण्यात आली. प्रातिनिधिक स्वरुपात काही ज्येष्ठ श्रेष्ठ शिक्षक आणि शिक्षिका आणि तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्या वतीने सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करुन प्रशिक्षणाचे औपचारिक उदघाटन करण्यात आले. त्याप्रसंगी सन्मा. सावंतसर , मा. अत्तारसर , मा. ठाकूर मॅडम यांनी आपले विचार मांडले. रविंद्रनाथ टागोर त्याकाळात म्हणाले होते ते अजूनही आणि पुढेही बरोबरच असणार आहे. त्यांनी म्हटले होते , “ एक प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिव्याला प्रकाशमान करू शकतो ”. त्याप्रमाणे प्रत्येक मान्यवरांनी प्रशिक्षण हि काळाची गरज असल्याचे प्रामुख्याने स्पष्ट केले. सर्व मान्यवरांचे प्रशिक्षण आयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करण्यात आले.
मा. राठोड सर यांनी पहिल्या व्याख्यानाला सुरुवात केली. अस्खलित मराठीत बोलत त्यांनी प्रशिक्षणाची व अभ्यासक्रमाची पूर्वपीठिका सांगितली. मुदलियार आयोग , कोठारी आयोग , राष्ट्रीय शैक्षणिक धोरण , क्षमताधिष्ठीत अभ्यासक्रम आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा इत्यादी बदल होत गेलेल्या सर्व अभ्यासक्रमांबाबत तपशीलवार माहिती देत आपले व्याख्यान अतिशय उत्तम प्रकारे सादर केले. त्यामध्ये त्यांनी काही उदाहरणे दिली. गणित , विज्ञान विषयक उदाहरणे देताना त्यांना काही प्रश्न विचारून प्रशिक्षणार्थींना बोलते केले. त्यांनी प्रशिक्षणाची उद्दिष्टे सांगितली आणि प्रशिक्षणानंतर फलनिष्पत्ती काय असायला पाहिजे तेही सांगितले.
त्यानंतर मा. हर्याण सर यांनी आपल्या सुंदर शैलीत व्याख्यान घेतले. सहावी ते बारावी पर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण असल्याने कनिष्ठ महाविद्यालयाला शिकविणारी प्राध्यापक मंडळी आमच्यासोबत आहेत या गोष्टीचा जिल्हा परिषद शाळेत शिकविणाऱ्या आमच्यासारख्या शिक्षकांना खूप आनंद होता. हे असे पहिल्यांदा घडले असावे . त्यामुळे हे प्रशिक्षण खूप आगळेवेगळे असणार याबद्दल खात्रीच झाली. त्यांनी व्याख्यानाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत विविध किस्से आणि शिक्षणातील गोड गमती सांगत प्रशिक्षणार्थ्यांना खिळवून ठेवले. त्यांनी पायाभूत स्तर , पूर्वतयारी स्तर , पूर्वमाध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर सांगितले. बालवाटिका बाबत आणि अंगणवाडी शिक्षिका यांच्या या प्रशिक्षणाबाबत काही प्रशिक्षणार्थींनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनाही व्याख्यात्यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रोजेक्टरचा वापर करून आधुनिक पद्धतीने शिकवत असल्याने आनंद होत होता.
त्यानंतर मा. मुद्राळे मॅडम यांनी पाढ्यांनी सुरुवात केली. सर्वांनी दिलेल्या वेळेत जास्तीत जास्त पाढे लिहिण्याचा प्रयत्न केला. जास्त पाढे लिहू शकणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. पंचकोश म्हणजे काय ते समजावून सांगितले. अन्नमय कोष , प्राणमय कोष , विज्ञानमय कोष , मनोमय कोष आणि आनंदमय कोष या पाचही कोषांची माहिती दिली. आपण या पाचही कोशांचा उपयोग आपल्या अध्यापनात करत असतो याबद्दलही सांगितले. यापुढे यांचा जाणीवपूर्वक वापर करावा असेही त्यांनी सांगितले. शिक्षणाची लक्ष्ये , अभ्यासक्रमाची ध्येये , क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती या चारही बाबींचा पुन्हा पुन्हा पुनरुच्चार होताना दिसत होता.
काही वेळेसाठी ऑनलाईन स्वरूपात गुगल फॉर्मवर पूर्वचाचणी सोडविण्यासाठी देण्यात आली. सर्वांनी ती सोडवली. सर्वांना नाश्ता देण्यात आला. थोड्यावेळेची छोटी सुट्टी देण्यात आली.
पुन्हा मा. राठोडसर यांनी आपल्या आजच्या शेवटच्या चौथ्या तासिकेला सुरुवात केली. त्यांनी त्यात शिक्षणाच्या लक्ष्यांपासून अध्ययन निष्पत्तीपर्यंतच्या सर्व गोष्टी स्पष्ट केल्या. अभ्यासक्रमाची ध्येये अधिक ठळक केली. शारीरिक विकास , सामाजिक , भावनिक , नैतिक विकास , बोधात्मक विकास , भाषा व साक्षरता विकास , सौंदर्यदृष्टी आणि सांस्कृतिक विकास , आत्मिक विकास यावर अधिक माहिती दिली.
आजचा दिवस अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक , संयोजक आणि प्रशिक्षणार्थी यांचे आभार.
लेखन : प्रवीण कुबल
⭕ पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मोहीम (FLN)
प्रारंभिक शिक्षणः
ग्रंथ प्रवर्धनः राष्ट्रीय ग्रंथप्रवर्धन धोरणाची निर्मिती करणे सार्वजनिक आणि शालेय ग्रंथालयाचा विस्तार करणे.
प्रारंभिक वाचन, लेखन आणि गणित यावर विशेष लक्ष देणे.
३ महिन्याची खेळ आधारित शाळा: इयता पहिलीतील सर्व विद्यार्थ्यांसाठी खेळ आधारित तीन महिन्याची शाळा तयारी घटकसंच
राष्ट्रीय संचयिकाः दीक्षा
(DIKSHA) वरील उच्च दर्जाचे अध्यापन आणि अध्ययन संसाधने-राष्ट्रीय संचविका
रष्ट्रीय मोहीमः पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यासाठी राष्ट्रीय मोहीम
पायाभूत कौशल्येः पायाभूत अध्ययन कौशल्याचे सार्वत्रिक संपादन
३ री पर्यंत म्हणजेच २०२६-२७ पर्यंत FLN साध्य करणे
🔸ग्रंथालयः शालेय ग्रंथालायामध्ये डिजिटल ग्रंथालयाचा लाभ