Thursday, December 31, 2020

माऊली वारकरी सांप्रदाय मंडळ शिडवणे व नॕब आय हाॕस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न

 शिडवणे : दिनांक : ३१ डिसेंबर २०२० : 


          शिडवणे टक्केवाडी येथे माऊली वारकरी सांप्रदाय मंडळ, शिडवणे यांच्या वतीने एक दिवसीय मोफत नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न झाले.  नॕब आय हाॕस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय कणकवली व मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचा उपक्रम राबवण्यात आला.

          माऊली वारकरी सांप्रदाय मंडळ गेली तीन वर्षे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे. नुकताच मंडळाचा वर्धापन दिनही समारंभपूर्वक साजरा करण्यात आला होती. मंडळाने नवीन वर्षाची दिनदर्शिकादेखील तयार केली आहे. शिडवणे गावातील वृद्ध व मोतीबिंदू आजाराने पिडित असणाऱ्या व्यक्तिंसाठी एक दिवसीय ' मोफत नेत्र चिकित्सा शिबीर ' आयोजित करण्यात आले होते. शिबीरामध्ये ५० व्यक्तींची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवून तपासणी करण्यात आली. मोतीबिंदू असलेल्या व्यक्तींना नॕब आय हाॕस्पिटल मिरजच्या साहाय्याने डोळ्यांचे आॕपरेशन करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या व डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात आले. 

          तपासणी चिकित्सेसाठी उपस्थित असणाऱ्या डॉ. संदिप कदम व त्यांचे सहाय्यक आयरे यांचा मंडळाच्या वतीने अध्यक्ष धोंडू पाष्टे यांनी शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष धोंडू दामू पाष्टे, उपाध्यक्ष अनिल रमेश पांचाळ, खजिनदार सिताराम ( बाबा ) भिवा टक्के, कार्याध्यक्ष महेंद्र प्रभाकर टक्के , आत्माराम नारायण पाष्टे , परशुराम शंकर पाष्टे, रजनीकांत शशिकांत चव्हाण , प्रवीण विठ्ठल शेटये, धोंडू सिताराम भिसे , मनस्वी महेंद्र टक्के , सखाराम पांडुरंग पाटणकर , आबा नारायण टक्के , गोविंद विष्णू पाष्टे आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. शिबीराचा एकूण ४७ जणांनी लाभ घेतला. कार्याध्यक्ष महेंद्र टक्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.












Tuesday, December 15, 2020

शाळा कुरंगवणे खैराट येथे भूमिपूजन

शाळा कुरंगवणे खैराट येथे भूमिपूजन

                 जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा कुरंगवणे खैराट येथे सर्वसाधारण जिल्हा विकास योजना 2019-20 अंतर्गत मंजूर असलेल्या शाळा इमारत दुरुस्ती (रु.8 लाख) कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे वित्त व बांधकाम समिती सभापती रविंद्र जठार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

              यावेळी कुरंगवणे सरपंच सरिता पवार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबला गोसावी, उपाध्यक्ष बाबू गोठणकर,मुख्याध्यापक श्रीपाद बागडी यांसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.



Friday, December 11, 2020

केंद्रशाळा शेर्पेची शैक्षणिक वाटचाल आदर्शवत : शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकरसाहेब

 केंद्रशाळा शेर्पेची शैक्षणिक वाटचाल आदर्शवत- एकनाथ आंबोकर

                                                   

शेर्पे :  दिनांक ११ डिसेंबर २०२०












          शेर्पे नं.१ शाळेला शिक्षणाधिकारी प्राथमिक सिंधुदुर्ग यांनी सदिच्छा भेट दिली .त्या भेटी प्रसंगी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व स्पर्धा परीक्षा तयारी याबाबत शाळेचे कामकाज गौरवास्पद आहे असे गौरवोद्गार काढले. 

           शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत गुणवंत होत असल्याबद्दल सर्व  विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुकासह अभिनंदन केले. भेटीप्रसंगी रिद्धी राजू गर्जे या शाळेच्या विद्यार्थिनीचे जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

           तसेच पाचवी जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी मध्ये पाचवी व कणकवली तालुक्यात प्रथम आलेली विद्यार्थिनी म्हणूनही तिचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले व तिला शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे ,मार्गदशक अमोल भंडारी, पालक राजू गर्जे व  शारदा तांदळे यांचेही गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. 

           याप्रसंगी शाळेमध्ये राबवित असलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली. शाळेला लाभलेल्या लोक सहभागाबद्दल व दात्यांच्या दातृत्वाचे  विशेष कौतुक केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे , कणकवली गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर , तळेरे प्रभागाचे विस्तार अधिकारी सुहास पाताडे , कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार,  शेर्पे सरपंच निशा गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष शेलार , विलास पांचाळ , दशरथ शिंगारे,अमोल भंडारी, राजू गर्जे, शारदा तांदळे उपस्थित होते.

Thursday, December 3, 2020

विनम्र होऊन निश्चयाप्रमाणे आचरण करा : रत्नदिप टक्के

 


शिडवणे दिनांक : ०१ डिसेंबर २०२० :




    “ आयुष्यात यशस्वी व्हायचे असल्यास नेहमी निश्यय करा. केलेल्या निश्ययाप्रमाणे प्रत्येकाने आचरण करा. भरपूर शिका आणि शिकून विनम्रतेने समाजकार्यात सहभागी व्हा  ” , असे हृदय उदगार भायखळा पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप टक्के यांनी शिडवणे माऊली वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वर्धापन दिनाच्या सत्कार समारंभाला उत्तर देताना अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. “ वारकरी सांप्रदाय मंडळाच्या प्रत्येक व्यक्तीने योग्य असे आचरण करून समाजापुढे आदर्श ठेवावा ” असे आवाहन प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार यांनी केले. 

    प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी शिडवणे माऊली वारकरी सांप्रदाय मंडळाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.त्यावेळी मंडळाचे आधारस्तंभ बाळूशेठ देवधर,ह.भ.प.किर्तनकार भोरसेमहाराज, मंडळाचे अध्यक्ष धोंडू पाष्टे, शिडवणे सरपंच शीतल शिवराम जाधव, उपसरपंच दिपक पाटणकर, समीर सदाशिव कुडतरकर ,सुरेश पांचाळ, जाधव महाराज, राजेश पडवळ,पाटकर महाराज, भोवड महाराज, बाबू काटाळे महाराज ,राणे महाराज, चंद्रकांत पार्टे, वनिता गोसावी महाराज, अर्णव सुहास पिसे, शिडवणे नं. १ चे मुख्याध्यापक सुनिल तांबे ,जगन्नाथ खानविलकर, गोविंद चिमाजी वाघरे, गणेश पांडुरंग टक्के, अनिकेत ( भाई ) गोविंद पाष्टे, सुनिल गणपत टक्के, विजय महादेव टक्के, संजय कोकाटे, गुरुदास टक्के, प्रवीण कुबल, झिमाळ महाराज, पाचकुडे महाराज यांचा सत्कार करण्यात आला. 

    दिवसभर विविध भक्तिभावपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भव्य दिंडी प्रदर्शन, श्री सत्यनारायणाची महापूजा व आरती, महाप्रसाद, दिंडीभजन, मान्यवरांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि ह.  भ. प . भोरसेमहाराज ( पंढरपूर ) यांचे सुश्राव्य किर्तन असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम नियोजनपूर्वक करण्यात आले.मंडळाने पूरग्रस्तांसाठी २१००० रुपयांची रोख मदत मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी मध्ये जमा केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा शिडवणे नं. १ आणि शाळा शिडवणे कोनेवाडी शाळांच्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रामध्ये व गावामध्ये सर्वांना मास्कचे वाटप करण्यात आले होते. कोरोना संकट काळात माऊली वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने १५० गरजूंना भाजीचे वाटप करण्यात आले होते.मंडळाने राबवलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल मान्यवरांनी मुक्तकंठाने स्तुती केली व सामाजिक भान ठेवून कार्य करत असल्याबद्दल आभारही मानले.

  त्यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अनिल रमेश पांचाळ, कार्याध्यक्ष महेंद्र प्रभाकर टक्के,विजय महादेव टक्के, दत्तात्रय नामये, गोविंद विष्णू पाष्टे, शीतल सिताराम टक्के, सचिव उमेश अंकुश मेस्त्री, उपकार्याध्यक्ष परशुराम पाष्टे, विठोबा मनोहर पाष्टे, सखाराम पांडुरंग पाटणकर,आत्माराम नारायण पाष्टे,आबा नारायण टक्के, धोंडू सिताराम भिसे,रजनीकांत चव्हाण, प्रवीण शेट्ये, मनस्वी महेंद्र टक्के, खजिनदार बाबा टक्के, मनोहर पाष्टे, योगेश सुतार, रविंद्र पांचाळ ,संदीप पाष्टे , योगेश शिंदे , शिवाजी वारिसे , सिद्धेश कांबळी, सुरेश कांबळी, अशोक धोंडू पाष्टे, विजय गिरकर, यशवंत धाकू नामये, सदानंद अनंत टक्के, राजाराम मेस्त्री, विजय लक्ष्मण पाटणकर, आबा नारायण टक्के, लिंबराज शिंदे, मंगेश बिनकर, मनस्वी महेंद्र टक्के, रोशना अनिल पांचाळ, जयवंती वसंत टक्के,अक्षय सिताराम टक्के, राजाराम गोपाळ मेस्त्री आणि ग्रामपंचायत शिडवणे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य केले. 

शिडवणे गावातील शिडवणे नं. १ व शिडवणे कोनेवाडी शाळेतील पहिली ते सातवीच्या पहिल्या तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या एकूण ४२ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मंडळाच्या वतीने आकर्षक प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. अर्णव सुहास पिसे याला मेडिकलला प्रवेश मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिडवणे नं. १ शाळेचे पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल यांनी केले. 

Saturday, June 27, 2020

सलून दर वाढणे अपरिहार्य : अनिल अणावकर

कणकवली दिनांक : २७ जून २०२० :
                    कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नाभिक व्यावसायिकांना स्वतःची व आपल्या ग्राहकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक सेवा देणे ही काळाची गरज बनली आहे. यासाठी ग्राहकांना सध्या सिंधुदुर्गातील नाभिक व्यावसायिक अत्यंत चांगल्या दर्जाची व सुरक्षित सेवा देत आहेत. ग्राहक- कारागीर दोहोंच्या हितासाठी युज अँड थ्रो प्रकारचे साहित्य वापरणे बहुसंख्य नाभिक बांधवांनी सुरु केले आहे. सलून मध्ये प्रवेश केल्यापासून  विविध अटी शर्तींचे पालन करत नाभिक व्यावसायिक इमाने इतबारे आपली सेवा बजावताना दिसत आहेत. सध्या वापरत असलेले विघटनशील साहित्य महागडे आहे. त्यामुळे सुरक्षित सेवा देत असताना ग्राहकाची आणि स्वतःची काळजी घेण्याच्या खटाटोपात ग्राहकांना जादा दर द्यावे लागत आहेत. त्यामुळे नाईलाजाने किंवा काळाची गरज म्हणून यापुढे सलून दर वाढणे अपरिहार्य असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या सभेमध्ये केले.
                    नुकतीच अनिल अणावकर यांच्या कणकवली निवासस्थानी कणकवली तालुका नाभिक संघटनेची सभा सुरक्षित अंतर ठेवून, सॅनिटायझर, मास्क यांचा वापर करून घेण्यात आली. त्यावेळी कणकवली शहरातील विभागीय अध्यक्ष , महत्त्वाचे पदाधिकारी , सलून मालक- चालक , कारागीर असे मोजकेच नाभिक बांधव उपस्थित होते. शासकीय नियमांचे पालन करत सध्या सलून व्यवसाय सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु आहेत. फक्त ७ तास सेवा असूनही ग्राहकबंधू नाभिक व्यावसायिकांना सहकार्य करत असल्याबद्दल जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.
                    सलूनमध्ये प्रवेश करताना ग्राहकाला सॅनिटायझर वापरायला देणे, युज अँड थ्रो ची चादर वापरणे, युज अँड थ्रो टॉवेल वापरणे, त्वचेशी जास्त संपर्क येणार नाही असे काम करणे, काम करताना अजिबात न बोलणे, आलेल्या सर्व ग्राहकांच्या नोंदी ठेवणे, एक ग्राहक झाल्यानंतर खुर्ची निर्जंतुक करणे, वापरलेल्या युज अँड थ्रो साहित्याचे विघटन करणे, नॉन डिस्पोजेबल साहित्याचे प्रत्येक वेळी निर्जंतुकीकरण करणे इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून सूचना देण्यात आल्या.
                    शहरी विभागासाठी व एसी सेवा देत असलेल्या सलूनचे दरपत्रक निश्चित करण्यात आले. कनेडी, खारेपाटण, नांदगाव, फोंडा आणि तळेरे अशा  निमशहरी विभागाचे दरपत्रक बनवण्याचे अधिकार त्या विभागीय अध्यक्ष व कार्यकारिणीला देण्यात आलेले असल्याने ते आपला निर्णय घेतील असे ठरवण्यात आले. यापुढे युज अँड थ्रो च्या साहित्याचे दर वाढत जाणार असल्याने पुढील काळाला अनुसरून दर आकारणी सर्वानुमते करण्यात आली. ग्राहकांना सुरक्षित सेवा देत असल्याने दर वाढत आहेत, तरीही सुजाण ग्राहक कोणत्याही प्रकारची तक्रार न करता नाभिक व्यावसायिक चांगली सुरक्षित सेवा देत असल्याने समाधानी असल्याचे मत सर्वच सलून चालक , मालक आणि कारागीर यांनी व्यक्त केले.
                    दरपत्रकासंदर्भात सोमवार दिनांक २९ जून २०२० रोजी वेताळबांबर्डे येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय सभेमध्ये योग्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल असे प्रतिपादन जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण यांनी केले. लॉकडाऊन काळात निधन पावलेल्या नाभिक बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्ष लक्ष्मीकांत चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.


Saturday, April 11, 2020

ग्राहकमित्रहो, पाया पडतो तुमच्या पण नाभिकमित्राला सेवा देण्यासाठी गळी पाडू नका : अनिल अणावकर

कणकवली दिनांक : १२ एप्रिल २०२० :
                     सर्व भारतवासी हे आमचे खास मित्र आहेत, त्यांचा आणि आमचा अगदी जवळचा संबंध येतो. नाभिक सेवा देत असताना म्हणजेच दाढी, केस आणि विविध थेरपी करत असताना आम्हा नाभिकांचा ग्राहकमित्रांशी थेट संबंध येतो. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आम्ही नाभिक बांधव ग्राहकांना सेवा न देता घरी बसून देशाची सेवा करत आहोत. आदेशाचे पालन करताना आम्ही मेटाकुटीला आलो आहोत. सेवा केली तरी अडचणीत ....कारण आमच्यामुळे कोरोना पसरेल याची भीती..किंवा आम्हालाही कोरोनाबाधितांपासून लागण होण्याची शक्यता....
                     पण ग्राहकांना सेवा दिली नाही तरी अडचणीत ..... कारण कुटुंबाच्या कुटुंब उपाशीपोटी राहण्याचीही भीतीच ना ?....आणि ग्राहकांच्या तीव्र निराशेला तोंड द्यावे लागणार ते वेगळेच . सध्या आमचे प्रिय ग्राहक आम्हा नाभिकांना इतके आग्रह करत आहेत कि ....हातून गुन्हा घडला तरी काम करण्यास आमचे नाभिक बांधव प्रवृत्त झाले तर ती आमच्या नाभिक बांधवांची चूक कशी म्हणायची ? ... आम्ही आमचा सेवा धर्म पाळत आहोत...बस्स....पण आम्ही आमच्या नाभिक बांधवांना कळकळीची विनंती केलेली आहे कि काहीही झाले तरी चालेल ...पण नाभिक सेवा देऊच नका....
                     वर्तमानपत्रातून आवाहन करून झाले. whats app वर स्टेटस ठेवले. पण आता बरेच दिवस झाले आहेत. आमच्या ग्राहकांची आणि आमच्या नाभिक बांधवांचीही सहनशीलता संपली आहे. कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत राहिलेले नाही.. कितीही विनंती करूनही आमचे नाभिक जर आमचे ऐकत नाहीत...तर आम्ही संघटनात्मक त्यांच्यावर काय दबाव आणणार ? आम्ही तर त्यांना सांगून दमलो आहोत...
                     आता आमच्या प्रिय ग्राहकांनाच आम्हाला जाहीर विनंती करावीशी वाटत आहे. आमच्या नाभिक व्यवसायाला आधुनिक स्वरूप आल्यापासून आम्हाला आमचे ग्राहक जे सहकार्य करत आहेत , त्याबद्द्ल त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. पण ग्राहकमित्रांनो , आमचा सुद्धा जीवच आहे. मी जिल्हाध्यक्ष या नात्याने तुम्हाला हात जोडून विनंती करतो कि, आमच्या नाभिकमित्रांना कृपया अतिआग्रह करून नाभिक सेवा देण्यासाठी गळी पाडू नका.
                      आम्ही तुमच्या सेवेसाठी लवकरच येणार आहोत.. त्यावेळी अधिक अत्याधुनिक पद्धतीने आपली  आरोग्यदायक , तणावमुक्त सेवा देण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण सध्या तरी आपण आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. थोडे दिवस थांबलात ...तसेच आणखी थोडे दिवस थांबा. तुमचाही नाईलाज आहे, पण आम्ही तरी काय करणार ? दोघांच्याही निरोगी आरोग्यासाठी एवढेतरी आपणास करायलाच हवे. असे आवाहन  सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी केले आहे. 

Tuesday, April 7, 2020

नाभिक व्यावसायिकांना नुकसानभरपाई मिळावी : अनिल अणावकर

कणकवली : दिनांक : ०७/०४/२०२० :
२१ मार्चपासून १४ एप्रिल २०२० पर्यंत तब्बल २५ दिवस ‘ लॉकडाऊन ’ कालावधीमध्ये संपूर्ण सलून 
व्यावसायिक दुकाने बंद ठेवून शासनाला सहकार्य करत आहेत. ‘ कोरोना ’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी समस्त 
नाभिक व्यावसायिक आपापली दुकाने बंद ठेवून घरी थांबलेले आहेत. 
बारा बलुतेदारांपैकी एक असलेला आमचा पारंपरिक नाभिक व्यावसायिक हातावरचे पोट असलेला  
उदरनिर्वाह करणारा बलुतेदार आहे. त्याला सध्या उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. रोज काम करून त्या 
मिळकतीवर आपल्या कुटुंबाची उपजीविका करणारा नाभिक भरडला गेला आहे. कायद्याचे काटेकोरपणे पालन 
करीत गरीब बिचारा नाभिक घरी बसून सलून दुकाने उघडण्याची परवानगी मिळण्याची वाट पाहत बसलेला आहे. 
कोणत्याही आकस्मिक निधीची तरतूद नसल्याने आमचे नाभिक बांधव व्याकुळ झालेले आहेत. मा. मुख्यमंत्र्यांच्या
माध्यमातून किंवा आपत्कालीन आर्थिक योजनेमधून काही आर्थिक निधीची तरतूद करून आमच्या नाभिक बांधवांना रोखस्वरूपात नुकसान भरपाई मिळावी , असे विनंती निवेदन कणकवली नाभिक संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण , तालुका खजिनदार रमेश आचरेकर , संघटनेचे युवा नेते समीर चव्हाण , कणकवली नाभिक संघटनेचे सचिव प्रवीण कुबल या प्रतिनिधींनी दिले.
अजून एखादा आठवडा काम बंद असल्याने काही बांधव अक्षरशः रडकुंडीला आलेले आहेत. १४ एप्रिल 
नंतरही लॉकडाऊन सुरु राहणार असल्यास आमच्या नाभिक बांधवांचा पोटापाण्याचा प्रश्न आम्हाला पुढे सतत भेडसावणार आहे.तरी आमच्या मागणी अर्जाचा व निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असेही त्यांनी अर्जात म्हटले आहे. त्यावेळीअर्जासोबत कणकवलीतील सुमारे २१० नाभिक कारागिरांची यादीही दिलेली असून त्यांना आर्थिक किंवा जीवनावश्यक वस्तू मिळावेत अशीही  मागणी करण्यात आली.
आम्ही कणकवली नाभिक संघटनेच्या वतीने फोनसंपर्क, whats app, फेसबुक , वर्तमानपत्रात बातम्या 
प्रसिद्ध करून दुकाने बंदच ठेवण्याचे कळकळीचे आवाहन केलेले आहे. तरीही कणकवली तालुक्यात काही 
गावांमधून , वाड्यांमधून जर आमचे नाभिक बांधव ग्राहकांच्या घरी जाऊन किंवा ग्राहकाला आपल्या घरी बोलावून 
जर नाभिक सेवा देत असतील तर ते आम्हाला समजू शकत नाही आणि असे जर घडत असेल तर नाभिक 
संघटनेला ते मान्य नाही.कारण असे केल्याने कोरोनाचा प्रसार झाल्यास आपण सर्वजण मोठ्या संकटात सापडू 
शकतो.
     आमच्या नाभिक बांधवांना व अतिआग्रह करून काम करून घेणाऱ्या ग्राहकांना दोघांनाही कोरोना वाहक 
समजले जाऊ शकते. त्याचा फटका आमच्या प्रामाणिकपणे घरी बसून सहकार्य करणाऱ्या नाभिकांना विनाकारण 
बसू शकतो. तरी आपणास संघटनेच्या वतीने असे लेखी निवेदन करतो कि, कृपया आपल्या माध्यमातून आपण 
आमच्या ग्राहकांना व त्यांची सेवा करणाऱ्या नाभिक बांधवांना समज द्यावी, जेणेकरून अशी गुप्तसेवा देणाऱ्या व 
करून घेणाऱ्या वृत्तीला आळा बसू शकतो, असेही जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी दिलेल्या निवेदनपत्रात म्हटले आहे.
कणकवली तहसीलदार म्हणाले कि , सध्या कोणताही नुकसानभरपाई निधी नसून देणगीदारांकडून प्राप्त
जीवनावश्यक वस्तूंचे वितरण सुरु आहे. आत्यंतिक गरीब ५० ते ५५ नाभिक व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात तातडीची मदत दिली जाऊ शकते किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला कणकवलीमध्ये सुरु असलेल्या ' शिवभोजनाचा लाभ घेता येऊ शकतो असेही  त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे लॉकडाऊन काळात नाभिक सेवा देणाऱ्या व घेणाऱ्या दोघांनाही वर्तमानपत्रात प्रसिद्धी देऊन आवाहन करणार असल्याचे सांगितले.


Sunday, March 29, 2020

नाभिकांनो, लॉकडाऊन कालावधीत सलूने बंदच ठेवा : अनिल अणावकर

कणकवली : दिनांक ३० मार्च २०२० :
                    कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी २१ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व सलूने बंद असून लॉकडाऊन असेपर्यंत सर्व नाभिक बांधवांनी आपली सलूने बंद ठेवून शासनाला सहकार्य करावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे अध्यक्ष अनिल अणावकर यांनी केले आहे.
                    नाभिकांचा व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय आहे. परंपरेने चालत आलेल्या बारा बलुतेदारांपैकी एक असलेला नाभिक आज घरात बसलेला आहे. जिल्ह्यातील सर्व नाभिक आपापल्या परीने घरात थांबून पंतप्रधानांच्या आवाहनांप्रमाणे नियमांचे काटेकोर पालन करत आहेत. हातावरचे पोट असणाऱ्या या नाभिक व्यावसायिकांना सध्या आपला व्यवसाय करता येत नसल्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारागीर तर अर्धलीवर काम करणारे असल्याने त्यांना तर सध्या उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे. सर्व नाभिक घरात बसून असल्याने प्रसार माध्यमांच्या व विविध संपर्क माध्यमांच्याद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे सूचनांचे पालन करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही तुरळक ठिकाणी सलूने उघडी आहेत कि बंद आहेत यावर संघटनेच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाऊ शकत नाही.
                     सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेने वारंवार आवाहन करूनही जर ग्रामीण किंवा अन्य भागात सलूने उघडून जर सेवा दिली जात असेल तर संघटनेचा या गोष्टीला कडाडून विरोधच आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये असे काम करणे हे नाभिक संघटनेलासुद्धा मान्य नसून अशा बाबींचे संघटना समर्थन करत नाही. ' कोरोना ' पसरू नये यासाठी घरी बसून सहकार्य करणारे नाभिक त्यामुळे विचलित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही बहुसंख्य नाभिक बांधव नियमांचे प्रामाणिकपणे पालन करत घरात बसून आहेत. तसेच काही ग्राहकांच्या आग्रहाखातर त्यांच्या घरी जाऊन सेवा देणे हे देखील संघटनेला अजिबात मान्य नाही. आम्ही ग्राहकांसाठी असलो तरी देशहितासाठी आम्ही या लढ्यात देशासोबतच कायम राहणार आहोत. आमच्या प्रिय ग्राहकांची गैरसोय होत असली तरी आमचा नाईलाज आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक व्यावसायिक सर्व ग्राहकांची दिलगिरी व्यक्त करत असून कधी एकदा ग्राहकांना नव्या उमेदीने आरोग्यदायक सेवा देण्यासाठी सज्ज होता येईल याचीच वाट पाहत आहेत.
                       ग्राहक फोन करून नाभिक सेवा देण्यासाठी विनंती करतात म्हणून प्रत्येकाने स्टेटसवर विनंती देखील केलेली दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांचे फोन येणे बंद झालेले आहेत. आपला नाभिक मित्र कधी एकदा दुकान उघडतो आणि आम्हाला आमचे डोके त्याच्या ताब्यात देतो असे बऱ्याच ग्राहकांनी फोनवरही सांगितले आहे. केस, दाढी वाढवून बसलेले आमचे ग्राहक आम्हाला पाहवत नाहीत, पण आमच्या ग्राहकांची, सर्व देशवासीयांची आणि आमची काळजी घेण्याच्या दृष्टीने सध्या सलूनधंदा बंद ठेवणे एवढेच आपल्या हाती आहे. त्यामुळे कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष विजय चव्हाण यांनी केले आहे.
                       महाराष्ट्र राज्याचे नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्याशी फोनसंपर्क केला असता त्यांनी असे सांगितले कि प्रत्येकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन काटेकोरपणे पालन करावे. ' मन कि बात ' हा आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐकावा. घरी बसलेल्या नाभिक बांधवांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून ते आपल्या नाभिक बांधवांना नाराज करणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

Saturday, March 14, 2020

अमोल भंडारींसारखे आदर्श शिक्षक निर्माण व्हायला हवेत : सुहास पाताडे

शेर्पे दिनांक : १५/०३/२०२० :
            काही शिक्षक हे हाडाचे शिक्षक असतात. शिकवून विद्यार्थ्यांना शहाणे करणे हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून आणि पुरस्काराची अपेक्षा न बाळगता आपले शैक्षणिक काम अविरतपणे करत राहणे हे काम करणारे शेर्पे केंद्रातील सर्वांचे लाडके अमोल भंडारीगुरुजी यांना शेर्पे केंद्राचा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी अमोल भंडारी यांचे मनापासून कौतुक केले व त्यांच्या पुढील कार्याला अनेक उत्तम शुभेच्छा दिल्या. तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांच्या शुभहस्ते त्यांना आकर्षक प्रमाणपत्र , शाल ,श्रीफळ देऊन समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.
            हा पुरस्कार केंद्राच्या वतीने देताना केंद्रात हिरीरीने काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. अमोल भंडारी हे शेर्पे गावासारख्या कणकवलीपासून ४० किलोमीटर अंतरावरील दुर्गम भागात उपशिक्षक म्हणून काम करत आहेत. काही काळ त्यांना शेर्पे केंद्रशाळेत मुख्याध्यापक म्हणूनही जबाबदारी पार पाडावी लागली. केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवनवीन उपक्रम प्रसिद्धीची हाव न बाळगता तडीस नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु केले. सन २०११ ते २०१५ अशी सलग ५ वर्षे त्यांनी आपल्या शाळेतील मुले गुणवत्ता यादीत आणली.
            यासाठी पालकांशी सतत जिव्हाळ्याचे संबंध ठेवून भंडारी यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. या पालकसंपर्क क्षमतेचा उपयोग अमोल भंडारी यांनी आपली शाळा अधिक प्रगतिशील बनवण्यासाठी प्रामुख्याने केला. प्रसंगी त्यांना सिंधदुर्गचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे , तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , सहकारी शिक्षक , ग्रामस्थ यांचे सहकार्य घ्यावे लागले. अमोल भंडारी म्हणतात कि माझ्या आणि मुलांच्या विकासामध्ये सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ पालकांचा मोलाचा वाटा आहे.
            अमोल भंडारी यांनी २०१६ मध्ये राज्यशास्त्र विषयातून सेट परीक्षा पास होऊन प्राध्यापक होण्यापर्यंतची शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता वाढवली आहे. हे करत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबाची व पत्नीचीही अनमोल साथ लाभली असे सांगायलाही ते विसरत नाहीत. अशा हाडाच्या शिक्षकाचा सन्मान झाल्याबद्दल शेर्पे केंद्रातील सर्व अधिकारी व शिक्षकवृंद यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Thursday, March 12, 2020

सीताराम पारधिये यांना साळीस्ते केंद्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

साळीस्ते : दिनांक : १२ मार्च २०२० :
               शिक्षक हा शीलवान , क्षमाशील आणि कलाकार असावा लागतो असे म्हणतात. साळीस्ते नं. १ शाळेतील पदवीधर शिक्षक सीताराम दत्ताराम पारधिये यांच्याबद्दल असेच म्हणावे लागेल. त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना नुकताच ' केंद्रस्तरीय आदर्श शिक्षक ' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
              साळिस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख सदगुरु अनंत कुबल यांच्या संकल्पनेतून साळिस्ते केंद्रात हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप फोटोफ्रेम प्रमाणपत्र, शाल ,श्रीफळ ,गुलाब पुष्प असे होते. हा पुरस्कार सोहळा साळिस्ते नं. १ च्या  वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे औचित्य साधून तळेरे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यावेळी कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
             उपक्रमशील पदवीधर शिक्षक सीताराम पारधिये यांनी शालेय विविध उपक्रम, स्पर्धा परीक्षा,  सहशालेय उपक्रम,  ज्ञानी मी होणार स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, परसबाग स्पर्धा, उत्कर्षा कार्यक्रम यात कणकवली तालुक्यात अव्वल दर्जाचे कार्य केले आहे. त्याबद्दल सुहास पाताडे, सद्गुरू कुबल , सत्यवान घाडीगावकर यांनी गौरवोद्गार काढले. दिलीप तळेकर यांनीही केंद्रप्रमुख कुबल यांच्या संकल्पनेबद्दल कौतुक केले. या सन्मान सोहळ्याला साळीस्ते सरपंच मैथिली कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष ताम्हणकर , उपाध्यक्षा प्रेमलता गुरव , चंदूशेठ हरयाण , मंगेश कांबळे, अनिल ताम्हणकर, प्रभाकर ताम्हणकर, गोपाळ चव्हाण, साळीस्ते कांजीरच्या मुख्याध्यापिका पिसे , दिपक गुरव, संगीता वळवी, माधवी बुचडे , रवींद्र पाष्टे आणि बहुसंख्य पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.