Sunday, January 17, 2021

शिक्षिका राजश्री शेट्ये यांचा पालकांकडून सत्कार

शिक्षिका राजश्री शेट्ये यांचा पालकांकडून सत्कार


नाधवडे दि. १७ 


          ग्रामीण भागातही शिष्यवृत्ती सारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन नियोजनपूर्वक केले जाते. संदर्भ पुस्तके , जादा तासिका , सराव परीक्षा यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून यावर्षी सहा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून दिल्याबद्दल सर्व पालकांच्या वतीने विद्यामंदिर नाधवडे ब्राह्मणदेव शाळेच्या पदवीधर शिक्षिका राजश्री शेट्ये यांचा सत्कार करण्यात आला. 

          शाळेच्या वेळेनंतरही थांबून, प्रसंगानुरूप स्वखर्चाने वह्यापुस्तके देऊन, स्पर्धा परीक्षांसाठी स्वखर्चाने नेऊन पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निरंतर ज्ञानदान करणाऱ्या राजश्री शेट्ये यांचे पंचक्रोशीतून कौतुक करण्यात येत आहे. आतापर्यंत विविध स्पर्धा परीक्षा, सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षा इत्यादी स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. 

          श्रावणी चंद्रकांत नर , सिद्धेश भरडे , पराग कुडतरकर, प्रणय बोभाटे , श्रद्धा भरडे आणि सिद्धेश तानवडे इत्यादी विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्यासाठी त्यांनी केलेले अध्यापन महत्त्वपूर्ण ठरले आहे. प्रसिद्धीपासून कायमच दूर असणाऱ्या राजश्री शेट्ये यांनी केलेले शैक्षणिक कार्य म्हणूनच अभिनंदनीय आहे. म्हणून नुकतेच पालकांच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. 

          त्यावेळी सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, पालक प्रकाश बोभाटे, प्रकाश भरडे , रघुनाथ तानवडे, सुधीर भरडे , चंद्रकांत नर , संजय नकाशे , प्रल्हाद कुडतरकर, सुजाता कुडतरकर इत्यादी उपस्थित होते. पालकांनी राजश्री शेट्ये यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन धन्यवाद व्यक्त केले.


महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली ची कार्यकारिणी सभा संपन्न

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली ची कार्यकारिणी सभा संपन्न


January 17, 2021


 कणकवली दिनांक : १७ / ०१ / २०२१ :


          नुकतीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली तालुका कार्यकारिणीची सभा तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शाळा कणकवली क्रमांक ३ येथे संपन्न झाली. त्यावेळी शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस, तालुकाध्यक्ष विनायक जाधव, महिला सेल अध्यक्षा वृषाली सावंत, महिला सेल सचिव रश्मी आंगणे, सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुका कार्यकारिणी सदस्य, सर्व शिक्षक समिती शिलेदारांचे शाखेच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले. 

          तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी कोरोना काळात संघटनेने केलेला कार्याचा तारीखवार सविस्तर आढावा सादर केला. झालेल्या जमाखर्चाचे वाचन केल्यानंतर त्यावर चर्चा करून सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.जमा खर्चाचा हिशोब अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवल्याबद्दल त्याचप्रमाणे संघटनेच्या नावे एक लाख रुपयांची रक्कम मुदतठेवीत ठेवल्याबद्दल तालुकाध्यक्ष व सर्व तालुका कार्यकारिणी सदस्य या सर्वांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

          नवीन महिला कार्यकारिणी गठित करण्यासाठी कणकवली तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या सर्व महिला सदस्यांची बैठक शनिवारी २३ जानेवारी रोजी कलमठ बाजारपेठ येथे आयोजित करून महिला नवीन कार्यकारिणी गठित करण्याचे ठरविण्यात आले.चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी गुणगौरव,आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक यांचा सत्कार समारंभ २१ मार्च रोजी करण्याबाबत ठरविण्यात आले. 

          तालुका प्रसिद्धी प्रमुख या पदावर सर्वानुमते प्रवीण कुबल यांची निवड करण्यात आली.वाढदिवस यादी प्रसिध्द करणेबाबत विषय झाला. शिक्षक पतपेढीची निवडणुक होणार असल्याने केंद्रस्तरापासून नियोजन करण्याबाबत चर्चा झाली.

          त्यावेळी ४० पेक्षा जास्त शिक्षक उपस्थित होते. तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

         

Friday, January 8, 2021

शिडवणे नं.१ शाळेला शैक्षणिक देणगी प्राप्त

 शिडवणे : दिनांक : ०८ जानेवारी २०२१ :


            साबा सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून शिडवणे गावातील मुंबईस्थित शैक्षणिक देणगीदार महेश रघुनाथ शेट्ये यांच्या सौजन्याने शिडवणे नं. १ शाळेला यावर्षी वस्तुरूपाने पंचवीस हजार रुपयांची अनमोल अशी देणगी प्राप्त झाली आहे.  

            महेश शेट्ये यांनी आतापर्यंत शिडवणे नं. १ शाळेला साबा सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक वस्तूंचे वितरण केले आहे. त्यामध्ये एल.इ .डी . प्रोजेक्टर , संगणक प्रयोगशाळेसाठी संगणक, लॅपटॉप, स्पर्धा परीक्षा फी, स्पर्धा परीक्षा पुस्तके, दोन बॅटऱ्यांसह इन्व्हर्टर, लोखंडी ऑफिस कपाटे इत्यादी साहित्य दिलेले आहे. 

            यावर्षी त्यांनी शाळेसाठी मुलांना ऑफलाईन अध्यापनासाठी शैक्षणिक पेन ड्राईव्ह उपलब्ध करून दिले आहेत. इयत्ता १ ली ते ७ वीच्या मुलांना ‘ शाळा बंद , पण शिक्षण सुरु ‘ अंतर्गत अध्ययन सुलभ होण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्गासाठी शैक्षणिक पेन ड्राईव्ह रूपात देणगी दिली आहे. तसेच पाचवीच्या शिष्यवृत्तीला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ‘ शिष्यवृत्तीचा ऑफलाईन पेनड्राईव्ह ‘ उपलब्ध करून दिला आहे. शालेय रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्यासाठी व विद्यार्थ्यांनी बनवलेले साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी यावर्षी दोन लोखंडी ऑफिस कपाटेही दिली आहेत. 

            सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार ,  मुख्याध्यापक सुनिल तांबे , सर्व शिक्षकवृंद , शिडवणे नं. १ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रांबाडे आणि सर्व सदस्य यांनी शाळा व्यवस्थापन समितीमध्ये महेश शेट्ये आणि साबा सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट कंपनीच्या या शैक्षणिक देणगीबद्दल अभिनंदनाचा ठराव घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. ही देणगी मिळवून देण्यासाठी त्यांचे बंधू सुनिल राजाराम शेट्ये यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दलही व्यवस्थापन समितीने त्यांना धन्यवाद दिले आहेत. 

           त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा अनिता कुडतरकर , ग्रामपंचायत सदस्य अनिल पांचाळ, रामचंद्र पाटणकर, प्रिया भोवड , सरिता धुमाळ, समिता सुतार, सुप्रिया पाष्टे , नीता टक्के , पाटणकर , प्रवीण कुबल उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी सर्वांचे आभार मानले.