Saturday, March 14, 2020

अमोल भंडारींसारखे आदर्श शिक्षक निर्माण व्हायला हवेत : सुहास पाताडे

शेर्पे दिनांक : १५/०३/२०२० :
            काही शिक्षक हे हाडाचे शिक्षक असतात. शिकवून विद्यार्थ्यांना शहाणे करणे हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून आणि पुरस्काराची अपेक्षा न बाळगता आपले शैक्षणिक काम अविरतपणे करत राहणे हे काम करणारे शेर्पे केंद्रातील सर्वांचे लाडके अमोल भंडारीगुरुजी यांना शेर्पे केंद्राचा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी अमोल भंडारी यांचे मनापासून कौतुक केले व त्यांच्या पुढील कार्याला अनेक उत्तम शुभेच्छा दिल्या. तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांच्या शुभहस्ते त्यांना आकर्षक प्रमाणपत्र , शाल ,श्रीफळ देऊन समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.
            हा पुरस्कार केंद्राच्या वतीने देताना केंद्रात हिरीरीने काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. अमोल भंडारी हे शेर्पे गावासारख्या कणकवलीपासून ४० किलोमीटर अंतरावरील दुर्गम भागात उपशिक्षक म्हणून काम करत आहेत. काही काळ त्यांना शेर्पे केंद्रशाळेत मुख्याध्यापक म्हणूनही जबाबदारी पार पाडावी लागली. केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवनवीन उपक्रम प्रसिद्धीची हाव न बाळगता तडीस नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु केले. सन २०११ ते २०१५ अशी सलग ५ वर्षे त्यांनी आपल्या शाळेतील मुले गुणवत्ता यादीत आणली.
            यासाठी पालकांशी सतत जिव्हाळ्याचे संबंध ठेवून भंडारी यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. या पालकसंपर्क क्षमतेचा उपयोग अमोल भंडारी यांनी आपली शाळा अधिक प्रगतिशील बनवण्यासाठी प्रामुख्याने केला. प्रसंगी त्यांना सिंधदुर्गचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे , तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , सहकारी शिक्षक , ग्रामस्थ यांचे सहकार्य घ्यावे लागले. अमोल भंडारी म्हणतात कि माझ्या आणि मुलांच्या विकासामध्ये सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ पालकांचा मोलाचा वाटा आहे.
            अमोल भंडारी यांनी २०१६ मध्ये राज्यशास्त्र विषयातून सेट परीक्षा पास होऊन प्राध्यापक होण्यापर्यंतची शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता वाढवली आहे. हे करत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबाची व पत्नीचीही अनमोल साथ लाभली असे सांगायलाही ते विसरत नाहीत. अशा हाडाच्या शिक्षकाचा सन्मान झाल्याबद्दल शेर्पे केंद्रातील सर्व अधिकारी व शिक्षकवृंद यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment