Sunday, March 29, 2020

नाभिकांनो, लॉकडाऊन कालावधीत सलूने बंदच ठेवा : अनिल अणावकर

कणकवली : दिनांक ३० मार्च २०२० :
                    कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी २१ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व सलूने बंद असून लॉकडाऊन असेपर्यंत सर्व नाभिक बांधवांनी आपली सलूने बंद ठेवून शासनाला सहकार्य करावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे अध्यक्ष अनिल अणावकर यांनी केले आहे.
                    नाभिकांचा व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय आहे. परंपरेने चालत आलेल्या बारा बलुतेदारांपैकी एक असलेला नाभिक आज घरात बसलेला आहे. जिल्ह्यातील सर्व नाभिक आपापल्या परीने घरात थांबून पंतप्रधानांच्या आवाहनांप्रमाणे नियमांचे काटेकोर पालन करत आहेत. हातावरचे पोट असणाऱ्या या नाभिक व्यावसायिकांना सध्या आपला व्यवसाय करता येत नसल्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारागीर तर अर्धलीवर काम करणारे असल्याने त्यांना तर सध्या उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे. सर्व नाभिक घरात बसून असल्याने प्रसार माध्यमांच्या व विविध संपर्क माध्यमांच्याद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे सूचनांचे पालन करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही तुरळक ठिकाणी सलूने उघडी आहेत कि बंद आहेत यावर संघटनेच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाऊ शकत नाही.
                     सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेने वारंवार आवाहन करूनही जर ग्रामीण किंवा अन्य भागात सलूने उघडून जर सेवा दिली जात असेल तर संघटनेचा या गोष्टीला कडाडून विरोधच आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये असे काम करणे हे नाभिक संघटनेलासुद्धा मान्य नसून अशा बाबींचे संघटना समर्थन करत नाही. ' कोरोना ' पसरू नये यासाठी घरी बसून सहकार्य करणारे नाभिक त्यामुळे विचलित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही बहुसंख्य नाभिक बांधव नियमांचे प्रामाणिकपणे पालन करत घरात बसून आहेत. तसेच काही ग्राहकांच्या आग्रहाखातर त्यांच्या घरी जाऊन सेवा देणे हे देखील संघटनेला अजिबात मान्य नाही. आम्ही ग्राहकांसाठी असलो तरी देशहितासाठी आम्ही या लढ्यात देशासोबतच कायम राहणार आहोत. आमच्या प्रिय ग्राहकांची गैरसोय होत असली तरी आमचा नाईलाज आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक व्यावसायिक सर्व ग्राहकांची दिलगिरी व्यक्त करत असून कधी एकदा ग्राहकांना नव्या उमेदीने आरोग्यदायक सेवा देण्यासाठी सज्ज होता येईल याचीच वाट पाहत आहेत.
                       ग्राहक फोन करून नाभिक सेवा देण्यासाठी विनंती करतात म्हणून प्रत्येकाने स्टेटसवर विनंती देखील केलेली दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांचे फोन येणे बंद झालेले आहेत. आपला नाभिक मित्र कधी एकदा दुकान उघडतो आणि आम्हाला आमचे डोके त्याच्या ताब्यात देतो असे बऱ्याच ग्राहकांनी फोनवरही सांगितले आहे. केस, दाढी वाढवून बसलेले आमचे ग्राहक आम्हाला पाहवत नाहीत, पण आमच्या ग्राहकांची, सर्व देशवासीयांची आणि आमची काळजी घेण्याच्या दृष्टीने सध्या सलूनधंदा बंद ठेवणे एवढेच आपल्या हाती आहे. त्यामुळे कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष विजय चव्हाण यांनी केले आहे.
                       महाराष्ट्र राज्याचे नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्याशी फोनसंपर्क केला असता त्यांनी असे सांगितले कि प्रत्येकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन काटेकोरपणे पालन करावे. ' मन कि बात ' हा आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐकावा. घरी बसलेल्या नाभिक बांधवांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून ते आपल्या नाभिक बांधवांना नाराज करणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment