कणकवली : दिनांक : ०७/०४/२०२० :
२१ मार्चपासून १४ एप्रिल २०२० पर्यंत तब्बल २५ दिवस ‘ लॉकडाऊन ’ कालावधीमध्ये संपूर्ण सलून
व्यावसायिक दुकाने बंद ठेवून शासनाला सहकार्य करत आहेत. ‘ कोरोना ’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी समस्त
नाभिक व्यावसायिक आपापली दुकाने बंद ठेवून घरी थांबलेले आहेत.
बारा बलुतेदारांपैकी एक असलेला आमचा पारंपरिक नाभिक व्यावसायिक हातावरचे पोट असलेला
उदरनिर्वाह करणारा बलुतेदार आहे. त्याला सध्या उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. रोज काम करून त्या
मिळकतीवर आपल्या कुटुंबाची उपजीविका करणारा नाभिक भरडला गेला आहे. कायद्याचे काटेकोरपणे पालन
करीत गरीब बिचारा नाभिक घरी बसून सलून दुकाने उघडण्याची परवानगी मिळण्याची वाट पाहत बसलेला आहे.
कोणत्याही आकस्मिक निधीची तरतूद नसल्याने आमचे नाभिक बांधव व्याकुळ झालेले आहेत. मा. मुख्यमंत्र्यांच्या
माध्यमातून किंवा आपत्कालीन आर्थिक योजनेमधून काही आर्थिक निधीची तरतूद करून आमच्या नाभिक बांधवांना रोखस्वरूपात नुकसान भरपाई मिळावी , असे विनंती निवेदन कणकवली नाभिक संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण , तालुका खजिनदार रमेश आचरेकर , संघटनेचे युवा नेते समीर चव्हाण , कणकवली नाभिक संघटनेचे सचिव प्रवीण कुबल या प्रतिनिधींनी दिले.
अजून एखादा आठवडा काम बंद असल्याने काही बांधव अक्षरशः रडकुंडीला आलेले आहेत. १४ एप्रिल
नंतरही लॉकडाऊन सुरु राहणार असल्यास आमच्या नाभिक बांधवांचा पोटापाण्याचा प्रश्न आम्हाला पुढे सतत भेडसावणार आहे.तरी आमच्या मागणी अर्जाचा व निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असेही त्यांनी अर्जात म्हटले आहे. त्यावेळीअर्जासोबत कणकवलीतील सुमारे २१० नाभिक कारागिरांची यादीही दिलेली असून त्यांना आर्थिक किंवा जीवनावश्यक वस्तू मिळावेत अशीही मागणी करण्यात आली.
आम्ही कणकवली नाभिक संघटनेच्या वतीने फोनसंपर्क, whats app, फेसबुक , वर्तमानपत्रात बातम्या
प्रसिद्ध करून दुकाने बंदच ठेवण्याचे कळकळीचे आवाहन केलेले आहे. तरीही कणकवली तालुक्यात काही
गावांमधून , वाड्यांमधून जर आमचे नाभिक बांधव ग्राहकांच्या घरी जाऊन किंवा ग्राहकाला आपल्या घरी बोलावून
जर नाभिक सेवा देत असतील तर ते आम्हाला समजू शकत नाही आणि असे जर घडत असेल तर नाभिक
संघटनेला ते मान्य नाही.कारण असे केल्याने कोरोनाचा प्रसार झाल्यास आपण सर्वजण मोठ्या संकटात सापडू
शकतो.
आमच्या नाभिक बांधवांना व अतिआग्रह करून काम करून घेणाऱ्या ग्राहकांना दोघांनाही कोरोना वाहक
समजले जाऊ शकते. त्याचा फटका आमच्या प्रामाणिकपणे घरी बसून सहकार्य करणाऱ्या नाभिकांना विनाकारण
बसू शकतो. तरी आपणास संघटनेच्या वतीने असे लेखी निवेदन करतो कि, कृपया आपल्या माध्यमातून आपण
आमच्या ग्राहकांना व त्यांची सेवा करणाऱ्या नाभिक बांधवांना समज द्यावी, जेणेकरून अशी गुप्तसेवा देणाऱ्या व
करून घेणाऱ्या वृत्तीला आळा बसू शकतो, असेही जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी दिलेल्या निवेदनपत्रात म्हटले आहे.
कणकवली तहसीलदार म्हणाले कि , सध्या कोणताही नुकसानभरपाई निधी नसून देणगीदारांकडून प्राप्त
जीवनावश्यक वस्तूंचे वितरण सुरु आहे. आत्यंतिक गरीब ५० ते ५५ नाभिक व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात तातडीची मदत दिली जाऊ शकते किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला कणकवलीमध्ये सुरु असलेल्या ' शिवभोजनाचा लाभ घेता येऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे लॉकडाऊन काळात नाभिक सेवा देणाऱ्या व घेणाऱ्या दोघांनाही वर्तमानपत्रात प्रसिद्धी देऊन आवाहन करणार असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment