Monday, August 30, 2021

मालवणी भाषेतील पहिली बालकांदबरी ' कारटो ' : प्रा. वैभव साटम

🟥 मालवणी भाषेतील पहिली
 बालकांदबरी ' कारटो ' :  प्रा. वैभव  साटम

 कणकवली : 

          कल्पना मलये लिखित कारटो या बालकांदबरी चे प्रकाशन नुकतेच कणकवली येथे प्रा. वैभव साटम यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. प्रा. साटम म्हणाले की मालवणी भाषेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे म्हणींचा वापर. लेखिकेने कारटो मध्ये मालवणी म्हणींचा आवश्यक तेथे वापर करून भाषेचं सौंदर्य जपलं आहे. गोट्या, लंपन,बोक्या सातबंडे  यांच्या रांगेत आता कारटो हा नवीन नायक आलेला आहे. 
          यावेळी विचारमंचावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे प्रमुख मार्गदर्शक भाई चव्हाण, कवी प्रा. मोहन कुंभार, प्रा. सिद्धार्थ तांबे, लेखिका कल्पना मलये आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी सुहास वरूणकर यांनी कारटोचा एक भाग वाचून केले. 
          या वेळी बोलताना भाई चव्हाण म्हणाले की कारटो मुळे मला माझे बालपण आठवले. प्रत्येकाला आपले बालपण आठवेल असेच लिखाण कल्पना मलये यांनी केले आहे. परिकथेत जगणाऱ्या मुलांना वास्तवाचे भान आणून देण्यास ही कादंबरी निश्चित भाग पाडेल.
          यावेळी शुभेच्छा देताना प्रा मोहन कुंभार म्हणाले की कारटो हा इथल्या मातीतला आहे. मालवणी भाषेत लिहीलेली ही कादंबरी कोकणी भवताल घेऊनच वावरते. लेखिकेने या पात्राला पूर्ण न्याय दिला असून लवकरच ही कादंबरी नाट्य रूपात, मालिकारूपात पाहायला मिळेल अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. 
          कादंबरी चे विवेचन करताना प्रा. सिद्धार्थ तांबे म्हणाले , ' कारटो ' हे शीर्षक देऊन लेखिका कल्पना मलये यांनी कल्पकता साधली आहे.काशीनाथ रघुनाथ टोपले या नावातील आद्याक्षरातून मालवणी बोलीभाषेत उपद्व्यापी मुलाला दिली जाणारी  'कारटो ' ही पदवीच जणु लेखिकेने बहाल केली आहे.मालवणी मुलखात व्यक्तीचं पाळण्यात ठेवलेलं नाव थेट न घेण्याची प्रथाच आहे. प्रशांतला फरसो तर राजेंद्र ला राजगो म्हणण्यात वावगं मानलं जात नाही.प्रत्येक मूल हे एकमेव व अद्वितीय असते . त्याच्या भवतालच्या परिस्थितीनुरूप ते घडते.परंतु त्याच्या विकासाच्या टप्प्यात त्याला पालक,समाज व शिक्षक यांनी सुयोग्य संधी दिली तर त्याच्या सर्जनशक्तीला निश्चित वाव मिळेल. बालमानसशास्त्र विचारात घेऊन त्याचे विचार ,भावना , कल्पना व  कौशल्याला फुलायची संधी दिली पाहिजे. पौगंडावस्थेतील मुलांच्या मनात चाललेल्या खळबळीला विधायक कृतीशील वळण लावण्यासाठी त्याच्या शिक्षक व पालकांनी झटले पाहिजे. मुळात निसर्गच मुलांना स्वयंशिक्षणाला प्रेरित करत असतो. केवळ पुस्तकी शिक्षणात पारंगत म्हणजे ' हुशार ' असे न मानता हस्तकौशल्य , झाडावर चढणे , पोहणे, उड्या मारणे, चित्र रेखाटणे , दुसऱ्यांना मदत करणे यातून मुलांना जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन लाभतो.' कारटो ' या बालकादंबरीतून लेखिका कल्पना मलये यांनी बालमनोविश्वाचा अचूक वेध घेतला आहे.हे पुस्तक वाचताना प्रत्येकाला आपल्या बाललीला  आठवाव्यात एवढ्या ताकदीने लेखिकेने ते लिहीले आहे. 
          आपल्या शिक्षकांवर नितांत श्रद्धा असणा-या विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांनी अढळ स्थान निर्माण करावे हाही या बालकादंबरीतून संदेश दिला आहे.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता टिकले यांनी केले तर आभार राजेश कदम यांनी मानले. कार्यक्रमाला संपादक सुभाष विभुते, कवी-पटकथाकार किरण येले, कवी बालाजी सुतार आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. 
          कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, दर्पण प्रबोधिनी, सम्यक साहित्य संसद, साने गुरुजी कथामाला, अखंड लोकमंच, मासिक ऋग्वेद प्रकाशन संस्था या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले. 
          कल्पना मलये यांचे गिल्बर्ट फर्नांडीस, विनायक जाधव, निकिता ठाकूर, नेहा मोरे, प्रदीप मांजरेकर, विकास तांबे, अभिनेते अभय खडपकर, राजेंद्र वर्णे, मधुरा पालव, सरिता पवार, नामानंद मोडक ,प्रा. अच्युत देसाई आदींनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.



No comments:

Post a Comment