Wednesday, February 16, 2022

शिक्षण परिषदेचे उत्कृष्ट आयोजन व कार्यवाही : उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे

 शिडवणे : दिनांक : १६ फेब्रुवारी २२

          शेर्पे खारेपाटण केंद्राच्या संयुक्त शिक्षण परिषदेचे आयोजन व कार्यवाही उत्कृष्ट रितीने केली असून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेला अशा प्रकारचे प्रशिक्षण अपेक्षित असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी शिडवणे नं. १ येथे बोलताना केले. 

          उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन परिषदेची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी शेर्पे खारेपाटण केंद्रांचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , खारेपाटण केंद्रशाळेचे केंद्रमुख्याध्यापक प्रदिप श्रावणकर व्यासपीठावर उपस्थित होते. शिडवणे नं.१ शाळेचे मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यावेळी खारेपाटण रामेश्वर शाळेने पायाभूत साक्षरता भाषा या विषयावर मार्गदर्शन केले. बेर्ले शाळेने  बहुभाषिक शिक्षण यावर मार्गदर्शन केले. नडगिवे शाळेतील शिक्षकांनी शाळा पूर्वतयारी कशी करावी याबद्दल माहिती दिली. वायंगणी शाळेने अमृतमहोत्सव विषयक शासन परिपत्रकाचे वाचन करुन उपक्रम समजावून सांगितले. शिडवणे कोनेवाडी शाळेने भाषिक उपक्रम व विद्यार्थी विकास या विषयावर मार्गदर्शन केले. 

          शिक्षण परिषद संपल्यानंतर खारेपाटण केंद्रांतर्गत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांना प्रमाणपत्रे देऊन उपशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. शिडवणे नं.१ शाळेच्या वतीने शिडवणे गावठणवाडी उत्कर्ष मंडळाच्या सौजन्याने महिला शिक्षकांना हळदीकुंकू देण्यात आले.शिडवणे शाळेच्या वतीने उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रवीण कुबल यांनी सूत्रसंचालन केले तर सुनिल तांबे यांनी आभार मानले.






































































No comments:

Post a Comment