▪दि. 04 जून - गप्पा गोष्टींचा कट्टा व इ.
आज रविवार दिनांक ४ जून रोजी शिडवणे नं.१ शाळेत सकाळी पावणे नऊ वाजता मुले आली. Whats app , फोन आणि प्रत्यक्ष भेटून मुलांना उपक्रमाबाबत कल्पना देण्यात आली होती. मुलांनी शाळेच्या बाह्य परिसराची स्वच्छता केली. त्यावेळी शाळेतील सर्व शिक्षक मुलांसोबत होते.
त्यानंतर मुलांना परिपाठात बसविल्याप्रमाणे बसण्यास सांगितले. सर्वांशी शिक्षकांनी गप्पा मारायला सुरुवात केली. मुलांनी सुट्टीत काय , काय केले ते सांगितले. कचरा काढणे , पाणी भरणे , टेबल पुसणे , भांडी घासणे , बॉयलरमध्ये काजू घालणे , छोट्या मुलांना सांभाळणे , बाबांना कामाच्या ठिकाणी डोंगरात जेवणाचा डबा नेऊन देणे , कपडे धुणे , झाडू मारणे , जेवण बनवणे , लादी पुसणे , आईबाबांनी सांगितलेली कामे करणे , गुरांना पाणी देणे आणि घरातील इतर आवश्यक कामे करत असल्याचे मुलांनी सांगितले. पहिलीत प्रवेश घेतलेल्या मुलांनीही गप्पांमध्ये सहभाग घेतला होता.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांचे पालक संवाद ग्रुपच्या माध्यमातून अभिनंदन केले असल्याबाबत सांगून त्यांना शुभेच्छा दिल्याबाबत सांगण्यात आले. वाचन आणि लेखन सराव करण्याबाबत चर्चा करण्यात आली. Whats App द्वारे पाठवलेली ‘ डोळ्यांचा भाव ‘ ही गोष्ट पुन्हा पुन्हा वाचण्याबाबत मुलांना आवाहन करण्यात आले. आज मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. दप्तराशिवाय व गणवेशविरहित शाळेत येऊन मुले अगदी तणावरहित वातावरणात शाळेत बोलत होती.


















No comments:
Post a Comment