शिडवणे : दिनांक : ०८ जानेवारी २०२१ :
साबा सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून शिडवणे गावातील मुंबईस्थित शैक्षणिक देणगीदार महेश रघुनाथ शेट्ये यांच्या सौजन्याने शिडवणे नं. १ शाळेला यावर्षी वस्तुरूपाने पंचवीस हजार रुपयांची अनमोल अशी देणगी प्राप्त झाली आहे.
महेश शेट्ये यांनी आतापर्यंत शिडवणे नं. १ शाळेला साबा सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक वस्तूंचे वितरण केले आहे. त्यामध्ये एल.इ .डी . प्रोजेक्टर , संगणक प्रयोगशाळेसाठी संगणक, लॅपटॉप, स्पर्धा परीक्षा फी, स्पर्धा परीक्षा पुस्तके, दोन बॅटऱ्यांसह इन्व्हर्टर, लोखंडी ऑफिस कपाटे इत्यादी साहित्य दिलेले आहे.
यावर्षी त्यांनी शाळेसाठी मुलांना ऑफलाईन अध्यापनासाठी शैक्षणिक पेन ड्राईव्ह उपलब्ध करून दिले आहेत. इयत्ता १ ली ते ७ वीच्या मुलांना ‘ शाळा बंद , पण शिक्षण सुरु ‘ अंतर्गत अध्ययन सुलभ होण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्गासाठी शैक्षणिक पेन ड्राईव्ह रूपात देणगी दिली आहे. तसेच पाचवीच्या शिष्यवृत्तीला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ‘ शिष्यवृत्तीचा ऑफलाईन पेनड्राईव्ह ‘ उपलब्ध करून दिला आहे. शालेय रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्यासाठी व विद्यार्थ्यांनी बनवलेले साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी यावर्षी दोन लोखंडी ऑफिस कपाटेही दिली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार , मुख्याध्यापक सुनिल तांबे , सर्व शिक्षकवृंद , शिडवणे नं. १ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रांबाडे आणि सर्व सदस्य यांनी शाळा व्यवस्थापन समितीमध्ये महेश शेट्ये आणि साबा सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट कंपनीच्या या शैक्षणिक देणगीबद्दल अभिनंदनाचा ठराव घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. ही देणगी मिळवून देण्यासाठी त्यांचे बंधू सुनिल राजाराम शेट्ये यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दलही व्यवस्थापन समितीने त्यांना धन्यवाद दिले आहेत.
त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा अनिता कुडतरकर , ग्रामपंचायत सदस्य अनिल पांचाळ, रामचंद्र पाटणकर, प्रिया भोवड , सरिता धुमाळ, समिता सुतार, सुप्रिया पाष्टे , नीता टक्के , पाटणकर , प्रवीण कुबल उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी सर्वांचे आभार मानले.


No comments:
Post a Comment