Friday, March 21, 2025

प्रशिक्षणाचा दुसरा दिवस

🟥 प्रशिक्षणाचा दुसरा दिवस 


          दुसरा दिवस म्हणजे १९ मार्च २०२५. सकाळ सत्रातील प्रशिक्षण आल्हाददायक वातावरणात सुरु झाले. खरंच सकाळची वेळ मुलांसाठीही कितीतरी चांगली असते. आपले अध्यापन ऐकण्यासाठी मुले नेहमीच सकाळ सत्रात जास्त एकाग्र असल्याची जाणवतात. आमच्या प्रशिक्षणाची वेळ सकाळची असल्याने प्रशिक्षणार्थी वेळेवर येऊन उपस्थित होत होते. वर्गाला सुरुवात झाली. 

          पहिली तासिका ‘ क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना ’ यावर घेण्यात आली. मा. हर्याण सरांच्या तासाने सुरुवात म्हणजे पर्वणीच. त्यांनी आपल्या तासिकेत घटकातील सर्व माहिती व्यवस्थित समजावून दिली. त्यात अध्ययन, अध्यापन, मूल्यांकन, कार्यनीती, प्रश्न प्रकार, प्रश्न निर्मिती कौशल्ये यावर भर देण्यात आला होता. विचार प्रवर्तक प्रश्न देखील बनवून घेण्यात आले. त्यांनी त्यांच्या तासिकेत इयत्ता नववीच्या कुमारभारती पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक १४ व्या आदर्शवादी मुळगावकर या शीर्षकाच्या लेखक गोविंद तळवळकर यांनी लिहिलेल्या पाठाचा संदर्भाने उल्लेख केला आणि सविस्तर गोष्टच सांगितली. ते असेही म्हणाले, “ तुझे आहे तुझ्यापाशी हे वाक्य प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. ” अमीर खानच्या ‘ थ्री इडियट्स ’ या हिंदी चित्रपटातील एक प्रसंगही त्यांनी वर्गात शब्दरूपाने उभा केला. विद्यार्थ्यांमध्ये जर आपण ‘ दुर्दम्य इच्छाशक्ती ’ निर्माण करु शकलो तरच मुले आयुष्यात यशस्वी होताना दिसतील. म्हणून आपल्याला मुलांना खरेखुरे अनुभव द्यावयाचे आहेत. मुलांसाठी आता Holistic Progress Card बनविण्याची जबाबदारीही आपल्यावर येते आहे. मूल्यांकन हे आपण मुलांवर आकारिक आणि संकलित मूल्यमापन करण्याअगोदर जे सुलभक म्हणून काम करणार आहोत ते असणार आहे. त्यानंतर जे असणार ते मूल्यमापन. मुले जसे दररोज नवीन शिकण्यासाठी आसुसलेले असतात, तसेच आपल्यालाही सतत अपडेट राहाणं ही काळाचीच गरज होऊन बसली आहे. 

          मा. राठोड सरांची तासिका ही समग्र माहितीने युक्त असते. आज सरांनी ‘ क्षमताधारित मूल्यांकनासाठीची कार्यपद्धती शिकविली. त्यात त्यांनी क्षमतांची निश्चिती, अध्ययन निष्पत्ती निश्चिती, मूल्यांकनांचे निकष, मूल्यांकन पद्धती, सप्रमाणता, सुस्पष्ट सुचना, संमिश्र पद्धती म्हणजेच ब्लेंडेड पद्धतीचा वापर, प्रत्याभरण, त्याचा अहवाल, सातत्यपूर्ण सुधारणा या गोष्टींवर प्रकाश टाकला. प्रशिक्षणावर त्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन त्यांनी केले. प्रोजेक्टर वर एक चित्र दाखवून त्या चित्रावर चर्चा करण्यात आली. चित्रांमध्ये प्राणी आणि पक्षी दाखवण्यात आले होते. त्यांच्या शेजारी एक झाड होते. त्याला शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्यांना अशी सूचना दिली होती की, “ सर्वांना एकच एक कृती करायची आहे ती म्हणजे या झाडावर चढायचे आहे. ” अनेक प्रशिक्षणार्थींनी चर्चा घडवून आणली. आपल्या वर्गातही असेच वेगवेगळ्या क्षमतांचे विद्यार्थी असतात. त्या सर्वांकडून आपण एखादी क्षमता झालीच पाहिजे असा आग्रह धरणे हे नक्कीच चुकीचे ठरेल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता वेगवेगळ्या असतात, त्यामुळे यापुढे आपल्याला विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक क्षमतांचाही विचार करायला हवा. राठोड सरांनी क्षमता आधारित मूल्यांकनांची साधने व तंत्रे समजावून सांगितली. त्यामध्ये त्यांनी स्वयं मूल्यांकन प्रश्नावली,  प्रत्याभरण सर्वेक्षण,  कौशल्य चाचण्या, क्षमता आधारित मुलाखती,  कौशल्यातील अंतराचे विश्लेषण, मानसशास्त्रीय चाचण्या, ई - पोर्टफोलिओ, अभिरूप आणि आभासी प्रयोगशाळा याबद्दल सविस्तर माहिती दिली. 

          

          त्यानंतर मुद्राळे मॅडम यांनी प्रश्नांचे प्रकार समजावून सांगितले. प्रश्न कसे असावे व प्रश्न कसे नसावे याबद्दल चर्चा घडवून आणली. प्रश्नांचे प्रकार सांगितले. प्रत्येक प्रश्न प्रकाराचा उपयोग व उद्देश सांगितला. प्रश्न विचारण्याच्या तंत्राची मूलभूत माहिती सांगितली. अध्ययन अध्यापनामध्ये अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी अचूक प्रश्न प्रकारांचा वापर कसा करावा हेही समजावून सांगितले. अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापनांची माहिती सांगत असताना शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यातील इष्ट बदल असतो हे त्यांनी स्पष्ट केले. अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू असतानाच आपल्याला वेळोवेळी मूल्यांकनाची गरज असते. म्हणूनच मूल्यांकन हे शिक्षण प्रक्रियेचे अविभाज्य अंग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्सनल निर्मिती करताना प्रश्न विचार प्रवर्तक असावेत. पटनांची रचना सुबोध व नेमक्या शब्दात करता आली पाहिजे. प्रश्न निसंदिग्ध व निश्चित स्वरूपाचे असायला हवेत. प्रश्नांची रचना सुद्धा निर्दोष असायला हवी. आपण तयार केलेले प्रश्न प्रमाणित असायला हवेत. प्रश्न विश्वसनीय असायला हवेत आणि त्यामध्ये वस्तुनिष्ठता सुद्धा असायला हवी. निम्नस्तरीय प्रश्न,  उच्चस्तरीय प्रश्न आणि पुस्तकासह चाचणी याबद्दलही त्यांनी ऊहापोह केला. स्वनिर्मितीला वाव देणारे प्रश्न आणि विषयानुरूप विचारमंथनासाठीचे प्रश्न याबद्दलही त्यांनी चर्चा घडवून आणली.   

          त्यानंतर हर्याण सरांनी प्रश्न निर्मिती संदर्भात समस्या आणि प्रश्न, सर्व शोध हे प्रश्नातून निर्माण होत असतात, प्रश्न असे हवे जे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे असतात यावर भाष्य केले. त्यांनी प्रश्न निर्मितीचा ओघ तक्ता समजावून सांगितला. त्यासाठी पहिल्यांदा क्षमता निश्चिती करायला हवी. त्यानंतर क्षमता विश्लेषण करून अध्ययन निष्पत्तींची निश्चिती करायला हवी. शिकवून शिकता येत नाही, मुलांना नकळत शिकवता आलं पाहिजे. मुलांनी स्वतः शिकण्याची इच्छा व्यक्त केली पाहिजे अशा प्रकारचं वातावरण आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे. मुलाने जर ठरवलं की मला शिकायचं आहे तरच तो शिकू शकतो. हा आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम शिक्षक म्हणून आपल्याला करायचं आहे. विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्वरूपाची इच्छाशक्ती जागृत करण्याचं काम शिक्षकाने करायला हवं. त्यावेळी त्यांनी अर्जुनाचे आणि एकलव्याचे उदाहरण देऊन प्रबळ इच्छाशक्ती असल्यास मुले स्वयंअध्ययनाने सुद्धा शिकू शकतात हे स्पष्ट केले. 

          आजचा दिवस सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सर्व प्रशिक्षणार्थी व तज्ञ मार्गदर्शक यांच्यासाठी  अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाला. सर्व तज्ञ मार्गदर्शक यांचे खूप खूप आभार. 


लेखन : प्रवीण कुबल


No comments:

Post a Comment