🔴 कुरंगवणे खैराट शाळेत शेर्पे व खारेपाटण केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद उत्साहात संपन्न;
🔹वार्षिक निकालपत्रांची तपासणी
कुरंगवणे, दि. २९: कुरंगवणे खैराट शाळेत शेर्पे आणि खारेपाटण केंद्रातील शिक्षकांची संयुक्त शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. या परिषदेमध्ये दोन्ही केंद्रातील सुमारे ५० शिक्षकांनी सहभाग घेतला.
सकाळच्या सत्रात सर्व सहभागी शाळांच्या संकलित मूल्यमापन वार्षिक निकालपत्रकांची कसून तपासणी करण्यात आली.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख संजय पवार होते. त्यांनी उपस्थितांना शैक्षणिक आणि प्रशासकीय बाबींविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. 'निपुण कृती कार्यक्रम' अंतर्गत विविध विषयांवर सखोल चर्चा आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
चिंचवली नं. १ शाळेच्या शिक्षिका शुभांगी गुरव यांनी 'भाषा: वाचन व लेखन' या विषयावर शिक्षकांना उपयुक्त टिप्स आणि मार्गदर्शन दिले. खारेपाटण हसोळटेंब शाळेच्या शिक्षिका शिवलीला निडसोसी यांनी 'संख्याज्ञान' या विषयाचे महत्त्व विशद करताना अनेक उदाहरणे दिली. नडगिवे नं. २ च्या शिक्षिका रेश्मा होणगुंठे यांनी 'संख्यांवरील क्रिया' या विषयावर मार्गदर्शन केले. केंद्रशाळा शेर्पेचे शिक्षक तुषार तांबे यांनी 'चावडी वाचन व गणन' या विषयावर आपले विचार आणि अनुभव शिक्षकांसोबत शेअर केले.
या महत्त्वपूर्ण शिक्षण परिषदेच्या वेळी प्रदीप श्रावणकर, श्रीपाद बागडी, सखाराम खरात आणि अनिता पाटकर यांच्यासह १८ शाळांमधील सुमारे ५० शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन गोविंद वावदाने यांनी केले आणि चिंचवली मधली शाळेचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. शाळांमधील शिक्षक राजू गर्जे आणि शारदा तांदळे यांनीही या परिषदेच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला आणि महत्त्वपूर्ण सहकार्य केले.













No comments:
Post a Comment