शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन: ओरोस येथे विद्यार्थी आणि पालकांचा एल्गार!
चला ओरोस.....चला ओरोस..... शिक्षण हक्क अधिनियम २००९ चा चुकीचा अर्थ लावून शासन स्तरावरील काही वरिष्ठ अधिकारी आपल्या मुलांचे शिक्षण बुडवण्याच्या आणि त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात आहेत. १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय याच षडयंत्राचा भाग आहे, ज्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. शासनाचे हे चुकीचे धोरण मोडीत काढण्यासाठी आणि शिक्षणाला वाचवण्यासाठी आता एकजूट होण्याची वेळ आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २ मे २०२५ चा मोर्चा कोण्या एका मुख्याध्यापकाचा, शिक्षकाचा नाही, तर तो सर्वसामान्य गरीब, ग्रामीण भागातील आणि जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा आहे. ज्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक नाकारले जात आहेत, त्यांचा सक्तीचे आणि मोफत शिक्षण घेण्याचा घटनात्मक हक्क हिरावून घेतला जात आहे. राज्यघटनेतील दुरुस्तीलाच छेद देणाऱ्या या अन्यायकारक धोरणाविरुद्ध हे विद्यार्थी आणि पालक आता रस्त्यावर उतरले आहेत!
विद्यार्थी आणि पालकांच्या घटनात्मक हक्कांवर गदा आणल्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. प्रशासनाला आणि सरकारला याची जाणीव व्हावी, यासाठी या आंदोलनात अधिकाधिक विद्यार्थी आणि पालकांनी सामील व्हावे, ही सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण समन्वय समितीची कळकळीची विनंती आहे.
सिंधुदुर्ग संस्थाचालक मंडळ, मुख्याध्यापक संघ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, पालक आणि विद्यार्थी २ मे २०२५ च्या आंदोलनात १००% सक्रिय सहभाग घेऊन हा मोर्चा यशस्वी करणार आहेत, यात शंका नाही.
उद्याच्या आंदोलनात फक्त दोन तास देऊन आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य वाचवण्यासाठी प्रयत्न करूया. एकजुटीने लढूया आणि या आंदोलनाला यशस्वी करूया!
सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी आणि सदस्यांना या आंदोलनात उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन आहे.
आंदोलनाचे ठिकाण: श्री देव रवळनाथ मंदिर, ओरोस
आंदोलनाची वेळ: सकाळी ११ वाजता
No comments:
Post a Comment