Thursday, May 1, 2025

शिक्षण हक्क पायदळी, सिंधुदुर्गात विद्यार्थी-पालकांचा विराट मोर्चा!

शिक्षण हक्क पायदळी, सिंधुदुर्गात विद्यार्थी-पालकांचा विराट मोर्चा!

ओरोस, दि. १ मे २०२५: शिक्षण हक्क अधिनियम २००९ चा चुकीचा अर्थ लावून गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा आणणाऱ्या राज्य सरकारच्या धोरणांविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनआक्रोश उसळला आहे. उद्या, दि. २ मे २०२५ रोजी ओरोस येथे विद्यार्थी आणि पालकांनी विराट मोर्चा आयोजित केला आहे. या अन्यायकारक धोरणामुळे जिल्हा परिषदेच्या आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांची संख्या कमी होणार असून, याचा फटका बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना बसणार आहे.

१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा सक्तीचे आणि मोफत शिक्षण घेण्याचा हक्क धोक्यात आला आहे, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. या शासन निर्णयाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक संघटना आणि संस्थाचालक एकवटले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "हा मोर्चा केवळ मुख्याध्यापक किंवा शिक्षकांचा नाही, तर तो गरीब, ग्रामीण भागातील आणि जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा आहे. ज्यांच्या मुलांच्या शाळेतील शिक्षक नाकारले जात आहेत, त्यांच्या घटनात्मक हक्कांचे उल्लंघन होत आहे."

विद्यार्थी आणि पालकांच्या घटनात्मक हक्कांवर होत असलेल्या आघातामुळे हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. प्रशासनाला आणि सरकारला याची जाणीव करून देण्यासाठी अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे.

सिंधुदुर्ग संस्थाचालक मंडळ, मुख्याध्यापक संघ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. उद्या सकाळी ११ वाजता श्री देव रवळनाथ मंदिर, ओरोस येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. आपल्या मुलांचे भविष्य वाचवण्यासाठी प्रत्येकाने दोन तास वेळ काढून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आपले चुकीचे धोरण मागे घेण्यास भाग पाडले जाईल, असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला आहे.


No comments:

Post a Comment