Monday, May 5, 2025

फ्लॉक लिडर/गाईड कॅप्टन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

फ्लॉक लिडर/गाईड कॅप्टन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी: महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य संस्थेच्या वतीने शिक्षकांसाठी एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे ७ दिवसीय राज्यस्तरीय फ्लॉक लिडर व गाईड कॅप्टन प्राथमिक आणि प्रगत प्रशिक्षण शिबिर दिनांक १४ मे २०२५ ते २० मे २०२५ या कालावधीत राज्य प्रशिक्षण केंद्र, सोनतळी, जि. कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.

ज्या शाळांना बुलबुल/गाईड युनिट सुरू करायची आहेत, त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. या प्रशिक्षण शिबिरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी कार्यालयाने केले आहे.

प्रशिक्षणासाठी पात्रता:

फ्लॉक लिडर/गाईड कॅप्टन प्राथमिक प्रशिक्षण:

 * प्रशिक्षणार्थी शिक्षिकेचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.

 * ०६ ते १० वयोगटातील मुलींबरोबर काम करण्याची आवड असावी (फ्लॉक लिडरसाठी).

 * १० ते १७ वयोगटातील मुलींबरोबर काम करण्याची आवड असावी (गाईड कॅप्टनसाठी).

 * खेळ, सहली, निसर्गनिवास आणि उघड्यावरील कार्यक्रमांची आवड असावी.

 * अंगणवाडी व बालवाडी सेविका/शिक्षिका देखील या प्रशिक्षणासाठी पात्र असतील.

फ्लॉक लिडर/गाईड कॅप्टन प्रगत प्रशिक्षण:

 * प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आणि किमान ६ महिन्यांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.

 * शिबिरास येताना प्राथमिक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र आणि त्याची झेरॉक्स सोबत आणावी.

 * जिल्हा कार्यालयाकडे युनिटची नोंदणी झालेली असावी आणि नोंदणीची सत्य प्रत सोबत आणावी.

 * युनिट चालवत असल्याबाबतच्या अधिकार पत्राची सत्यप्रत सोबत आणावी.

शिबिराचा तपशील:

 * शिबिराचा कालावधी: १४ मे २०२५ (सकाळी १२.०० वाजेपर्यंत उपस्थिती) ते २० मे २०२५ (सकाळी ११.०० वाजता परतीचा प्रवास).

 * शिबिर शुल्क: सर्व प्रकारच्या प्रशिक्षणासाठी शुल्क रु. १०००/- आहे, जे शिबिरस्थळी भरता येईल.

 * निवास: शिबिरार्थींना तंबूमध्ये राहावे लागेल, त्यामुळे अंथरुण-पांघरुण सोबत आणावे.

 * भोजन: शिबिरात शाकाहारी जेवणाची सोय असेल आणि चहा हे एकमेव पेय मिळेल. पहिल्या दिवसाचा दुपारचा डब्बा सोबत आणावा.

शिबिरस्थळी कसे पोहोचावे:

सोनतळी, कोल्हापूर येथे जाण्यासाठी कोल्हापूर रेल्वे स्टेशन व बस स्थानकावरून पन्हाळा किंवा ज्योतिबा बस पकडून स्काऊट बंगला, सोनतळी (पेट्रोल पंपाजवळ) येथे उतरावे. तसेच, सोन्या मारुती चौकातून केर्ले बसने देखील येथे पोहोचता येईल.

गणवेश आणि सोबत आणावयाचे साहित्य:

शिबिरार्थींनी एपीआरओ भाग २ नुसार पूर्ण गणवेशात उपस्थित राहावे. गणवेशासंबंधी अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. सोबत कंपास पेटी, रंगपेटी, फुटपट्टी, पेन, पेन्सिल, खोड रबर, कात्री, खडू, कार्डपेपर, सुई, दोरा, १० पांढरे कोरे कागद, २०० पानी फुल साईज रजिस्टर, १ सें.मी. व्यासाची ३ मीटर लांबीची सुती दोरी, ताट, वाटी, तांब्या, स्वच्छतेचे साहित्य, माचिस, मेणबत्ती, टॉर्च, ब्रश, टुथपेस्ट आणि नेहमी वापरण्याचे पुरेसे कपडे, बस्कर (आसन) व हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी एक पिशवी आणावी. संग्रही असल्यास गाण्याची वही आणि स्काऊटींग/गाईडींगवरील पुस्तके सोबत ठेवावीत.

महत्वाच्या सूचना:

शिबिरार्थींनी आनंदी वृत्ती, प्रसन्न चेहरा, कष्ट करण्याची तयारी, सहकार्याची भावना आणि शिकण्याची व कार्य करण्याची इच्छा बाळगणे आवश्यक आहे. कवायत करणे, शिबिरप्रमुखांनी सोपवलेली कामे करणे आणि प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेणे अनिवार्य आहे.

विशेष सूचना:

प्रशिक्षण वर्गाचे काम समाधानकारकपणे पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींनाच प्रमाणपत्र दिले जाईल. जे प्रशिक्षणार्थी मध्येच शिबिर सोडतील, त्यांना प्रमाणपत्र मिळणार नाही. रोजच्या रोज टाचण लिहिणे, शिस्त, वक्तशीरपणा, चलाखी, नेतृत्व, कल्पकता आणि चाचण्या पूर्ण करणे या बाबी प्रमाणपत्रासाठी विचारात घेतल्या जातील.

अधिक माहितीसाठी इच्छुक शिक्षकांनी सिंधुदुर्ग भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे किंवा दूरध्वनी क्रमांक (०२३६२) २२८७५२ / ८२०८८४१०६६ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment