Wednesday, January 22, 2020

खाद्यजत्रा हा उपक्रम मुलांना व्यावसायिक दृष्टीकोन देतो : रविंद्र जठार यांचे शेर्पे खाद्य महोत्सवात प्रतिपादन

शेर्पे : दिनांक : २२ जानेवारी २०२० :
          आपली मालवणी खाद्यसंस्कृती सगळीकडे प्रसिद्ध आहे. मोदक, लाडू, आप्पे, पुरणपोळ्या, भजी, साखरेची कापे, नारळाच्या वड्या इत्यादी खाद्यपदार्थ खवैयांना आवडणारे आहेत. असे विविध खाद्यपदार्थ बनवून ते विकल्यास चांगली कमाई होऊ शकते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनाही आर्थिक उलाढाल, बाजार , हिशेब इत्यादी गोष्टींची सवय लागते. असे खाद्यजत्रेसारखे उपक्रम राबवल्यास मुलांचा व्यावसायिक दृष्टीकोन तयार होऊन त्यांना भावी जीवनात यशस्वी व्यापारी होण्यासाठी सहाय्य्यभूत ठरेल , असे मत जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार यांनी शेर्पे नं. १ शाळेच्या खाद्यजत्रा महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
           कार्यक्रमाचे उदघाटन रविंद्र जठार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी पंचायत समिती सदस्या तृप्ती माळवदे , शेर्पे सरपंच निशा गुरव, उपसरपंच विलास पांचाळ, शेर्पे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष शेलार, शेर्पे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अत्तारसर , शेर्पे केंद्रातील शिक्षकवृंद , शेर्पे शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे, पाककृती बनवून आणलेले विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होते.
           अमोल भंडारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दशरथ शिंगारे यांनी प्रास्ताविक केले. मुलांना स्वतः पदार्थ बनवून ते विकता यावेत आणि त्या माध्यमातून अर्थार्जन करण्यासाठीचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला. शाळेत मुलांनी उभारलेल्या खाद्य स्टॊलना विविध राज्यांची नावे देण्यात आली होती. शेंगदाणा लाडू, रव्याचे लाडू, चुरमुऱ्याचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू, नारळाच्या वड्या , उकडीचे मोदक, पाणीपुरी, शेवपुरी, गोबी मंचुरियन , ढोकळा, ओली भेळ, सुकी भेळ, शेव लाडू, भजी , घावणे, मसाले ताक , चहा, खुसखुशीत कांदाभजी, खजुरी, गोड इडली, मसाले दूध, लिंबू सरबत, चिंच गोळा , पुरणपोळ्या, करंज्या, गुलाबजामून, मालपुवा, मुळ्याची भाजी, चायनीज  भेळ, कलिंगड भेस, तिखट इडली, गोड अप्पे , कानवले इत्यादी विविधांगी खाद्यप्रकारांनी रंगत आणली होती. खाद्यजत्रेला आलेल्या मुलांनी , पालकांनी , पदाधिकाऱ्यांनी सदर पदार्थांची चव घेत घेत छान मजा घेतली. खरेदी करताना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आपणही भावी व्यापारी बनू शकतो हा विश्वास मुलांनी मोठ्यांच्या  मनात निर्माण केला.
           या कार्यक्रमाचे औचित्य साधून ' रंगोत्सव ' स्पर्धेच्या यशस्वी मुलांना प्रशस्तीपत्र, चषक व मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक गौरविण्यात आले. मान्यवरांनी आपल्या मनोगतात शेर्पे शाळेच्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.












































No comments:

Post a Comment