Thursday, January 16, 2020

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी कटिबद्ध : रविंद्र जठार

शिडवणे : दिनांक : १६ जानेवारी २०२० :
          सिंधुदुर्गातील शिक्षक अत्यंत चांगल्या प्रकारचे काम करीत असून मला माझ्या शिक्षकांबद्दल अत्यंत आदर आहे. तळेरे प्रभागाच्या व शेर्पे साळीस्ते केंद्रांच्या वतीने शिक्षकांनी केलेल्या सत्काराबद्दल ऋणी राहणेच मला पसंत आहे. शिक्षकांच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी व शाळांच्या बांधकामविषयक मागण्या पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करीन , असे अभिवचन नवनिर्वाचित वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार यांनी शिडवणे नं. १ शाळेत ५ व्या शिक्षण परिषदेत बोलताना दिले.
          शेर्पे - साळीस्ते केंद्राच्या संयुक्त शिक्षण परिषदेची सुरुवात मान्यवरांच्या शारदापूजनाने व दिपप्रज्वलनाने झाली. परिषदेचे सूत्रसंचालन तळेरे नं . १ शाळेचे शिक्षक श्रीराम विभुते यांनी अतिशय सूत्रबद्ध केले. प्रास्ताविक करताना दोन्ही केंद्रांचे केंद्रप्रमुख सदगुरू कुबल यांनी शिक्षक राबवित असलेल्या उपक्रमांबद्दल गौरवोद्गार काढले. त्यानंतर शिडवणे नं. १ शाळेचे पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल यांनी ' २१ व्या शतकातील कौशल्ये - अध्ययन अध्यापन '  विषयाचे मार्गदर्शन केले. कुरंगवणे पश्चिम शाळेचे उपशिक्षक आशिष दुधे यांनी ' इंग्रजी भाषा विकसनासाठी शाळास्तरावर सुरु असलेले उपक्रम '  विषयावर उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. तळेरे नं. १ शाळेचे उपशिक्षक सत्यवान चव्हाण यांनी ' मॅजिक डायमंड ' बनवणेची कार्यशाळा घेतली. सर्व शिक्षकांनी सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
          शिडवणे नं. १ शाळेच्या वतीने सर्व महिला शिक्षिकांना ' हळदीकुंकू ' कार्यक्रम संपन्न करण्यात आला. त्यासाठी सीमा वरुणकर, सुजाता कुडतरकर आणि मुख्याध्यापक सुनिल तांबे यांचे विशेष सहकार्य लाभले. शिक्षण परिषदेत मार्गदर्शन केलेल्या सर्व मार्गदर्शकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळी पत्रकार उत्तम सावंत व गुरुप्रसाद सावंत उपस्थित होते. शेर्पे शाळेचे केंद्रमुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांनी सर्वांचे आभार मानले.





















































































No comments:

Post a Comment