Monday, January 20, 2020

आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व सभापती दिलीप तळेकर यांच्या पुढाकाराने शाळेतील मुलांना माफक दरात ' तान्हाजी ' चित्रपटाचे दर्शन

कणकवली : दिनांक : २० जानेवारी २०२० :
          खेड्यातील मुलांना सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. कणकवलीमध्ये येऊन सिनेमा बघणे ही गरीब मुलांसाठी एक पर्वणीच ठरेल. ही संधी उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची संकल्पना  आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली येथील लक्ष्मी चित्रमंदिर सिनेमागृहात ' तान्हाजी ' सारखा ऐतिहासिक चित्रपट माफक दरात दाखवून राबवली जात आहे. कणकवली पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती दिलीप तळेकर यांच्या पुढाकाराने मुलांच्या पहिल्या शो साठी शिडवणे. वारगाव, शेर्पे, तळेरे , कुरंगवणे या गावातील शाळांनी हजेरी लावली होती.
            त्यावेळी शेर्पे, साळीस्ते केंद्रामधील शाळांमधून मुलांनी शिवाजी महाराज , तानाजी, जिजाबाई, येसूबाई, संभाजी महाराज , मावळे अशा ऐतिहासिक वेशभूषा करून पहिल्या शो साठी एक आगळीवेगळी सुरुवात करून दिली. सभापती दिलीप तळेकर यांनी सर्व मुलांचे पुष्प देऊन स्वागत केले. मुलांनी ' जय भवानी , जय शिवाजी , जय तानाजी ' असा जयघोष करत सिनेमागृहात उत्साहाने प्रवेश केला. सर्व पदाधिकारी , अधिकारी , शिक्षक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. सीताराम पारधिये यांनी तळेरे प्रभागाच्या वतीने या उपक्रमाबद्दल आमदार नितेश राणे आणि सभापती दिलीप तळेकर यांच्या कार्याचे कौतुक केले.
            प्रवेशद्वाराकडे सर्व शालेय गणवेशातील विद्यार्थी पाहून परिसरातील लोक उत्सुकतेने पाहताना दिसत होते. सभापती दिलीप तळेकर , मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री आणि त्यांच्या टीमच्या वतीने सर्व विद्यार्थी , शिक्षकांना गरमागरम समोश्यांचे वितरण करण्यात आले. मुले अतिशय आनंदाने चित्रपट पाहत दोन अडीच तास रंगून गेली. जाता जाता सर्व पदाधिकाऱ्यांना टाटा करत त्यांचे मनस्वी आभार मानायलाही मुले विसरली नाहीत. अशी दुर्मिळ संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कणकवली गटशिक्षण कार्यालय , तळेरे प्रभागाचे विस्तार अधिकारी सुहास पाताडे , केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, नारायण ओटवकर , संजय पवार आणि सर्व लाभार्थी शाळा यांनी संयोजकांचे विशेष आभार मानले आहेत.




































































No comments:

Post a Comment