Monday, January 13, 2020

शिडवणे नं.१ शाळेत जिल्हास्तरीय राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत श्रमदान

शिडवणे : दिनांक : १३ जानेवारी :
            समाजाची सेवा करणे या मूल्याचे संवर्धन व्हावे या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हाभर राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत महाविद्यालयीन युवक- युवतींकडून श्रमसंस्कार शिबिरांचे आयोजन केले जात आहे. अभ्यास, समाजसेवा, प्रात्यक्षिक कार्य , श्रमदान, विनामूल्य सेवा देणे इत्यादी भावनेतून विद्यार्थ्यांनी केलेली शिबिरे अतिशय उत्तम रीतीने कार्य करताना दिसत आहेत.
            शिडवणे गावालाही या जिल्हास्तरीय श्रमसंस्कार शिबिराचा लाभ मिळाला. १५- १५ युवक युवतींनी गावात येऊन लोकांची सार्वजनिक स्वच्छतेची कामे अगदी मनापासून केली. शाळेची स्वच्छता , मंदिराची सफाई , ग्रामपंचायत परिसर लख्ख करणे , वनराई बंधारे बांधणे अशी विविध प्रकारची कामे करताना या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कोणतीही अपेक्षा न बाळगता केलेली कामे खरोखरच दाद देणारी ठरतील अशीच आहेत. अनोळखी परिसरामध्ये जाऊन तिथल्या लोकांशी संपर्क साधत त्यांना स्वच्छतेचे धडे देणारी ही युवा पिढी हसत खेळत कामे करताना पाहून गावातील मंडळी खजील झाल्याशिवाय राहिली नाहीत.
            शिडवणे नं. १ शाळेत एकूण १३ विद्यार्थ्यांनी साफसफाई करून शाळेला श्रमदान सेवा पुरवली. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल तांबे , प्रवीण कुबल , सीमा वरुणकर , सुजाता कुडतरकर या शिक्षकांनी सर्व स्वच्छतादूतांचे मनापासून आभार मानले. प्राध्यापक वसीम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली दशरथ इंगळे , चेतन राऊत, भूषण पाकळे , वृषाली नांदोस्कर, आदिती कुबडे, संजना तांबे, कमलेश पारकर, रामचंद्र सावंत, सुजाता पेडणेकर, कुणाल वेंगुर्लेकर , धनराज मोरे, सुकन्या जठार आणि किरण बेर्डे यांच्या स्वच्छता चमूने केलेले समाजकार्य अनमोल असेच आहे, असे मत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रांबाडे यांनी व्यक्त केले.

















No comments:

Post a Comment