Friday, December 27, 2019

शालेय उपक्रम कृतीशीलतेने राबवा : सद्गुरू कुबल

तळेरे : दिनांक : २७ डिसेंबर २०१९ :
          शालेय उपक्रम हे शाळेतील मुलांना अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी उपयुक्त ठरतात. शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना नवनवीन संकल्पना समजण्यासाठी एक अध्ययनशील व्यासपीठ निर्माण झाले आहे. म्हणून प्रत्येक शिक्षकाने त्यात सक्रिय सहभाग घेऊन सर्व शालेय उपक्रम कृतीशीलतेने राबवा , असे प्रतिपादन शेर्पे- साळीस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी व्यक्त केले.
          तळेरे नं. १ शाळेत डिसेंबर महिन्यातील शेर्पे व साळीस्ते केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद संपन्न झाली. त्यावेळी तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामधून सर्व शिक्षकांना प्रेरणा दिली. तालुकास्तरावर चॅम्पिअनशिप मिळवल्याबद्दल सर्व शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले. PGI , गणित पेटी , अनुधावन , विदयार्थी- शिक्षक- पालक यांच्यामधील संवाद यावर चर्चा घडवून आणली.
          "कृतिशील शिक्षणातून परिसर अभ्यास " या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तळेरे औदुंबर शाळेच्या उपशिक्षिका साळुंखे यांनी मराठी, इंग्रजी व गणित पेटीचा प्रभावी वापर कसा करावा याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तळेरे नं. १ शाळेच्या उपशिक्षिका लोकरे यांनी ' ERAC ' या अध्यापन पद्धतीविषयी उदाहरणासह मार्गदर्शन केले. पूर्वानुभव , चिंतन , संकलन आणि उपयोजन या मुद्द्यांना अनुसरून त्यांनी केलेले मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त असल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. श्रीराम विभुते यांनी सूत्रसंचालन तर सीताराम पारधिये यांनी सर्वांचे आभार मानले. 

No comments:

Post a Comment