शिडवणे : दिनांक : १४ डिसेंबर २०१९
सध्या जिल्हा परिषदेचा बाल क्रीडा महोत्सव हा उपक्रम सुरु असताना विद्यार्थी खेळात अधिक जलद, अधिक उंच आणि अधिक बलवान होण्याचा प्रयत्न करत आहेत. शाळेत विविध खेळांचा सराव करत असताना विद्यार्थी आपले कौशल्य पणाला लावत असतात. अशा वेळी कधी कधी मुले आपल्या जिवाचीही पर्वा करत नाहीत. त्यांना विजयी व्हायचे असते. विजयी होण्यासाठी सराव करणे तितकेच महत्त्वाचे असते. असाच सराव करत असताना शिडवणे नं. १ शाळेचा सहावीत शिकत असलेला विद्यार्थी सोहम मधुकर कासार्डेकर याच्या हाताला दुखापत झाली. त्याला डॉक्टरांकडे नेत असताना शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सोहमबद्दल समजले. त्याचे पालक मधुकर कासार्डेकर हेदेखील नेहमी आजारी असतात, मुलाची आई मोलमजुरी करून मुलांना शिक्षण देत आहे. अचानक आलेले हे संकट ते पेलू शकणार नाहीत याची जाणीव होऊन त्यांना तातडीची मदत शाळा व्यवस्थापन समिती शिडवणे नं.१ यांनी केली. तरीही आपणही काही आर्थिक सहकार्य करावे असे कणकवली तालुका शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांना वाटले. त्यांनी आपला मदतीचा हात पुढे केला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कणकवली तालुक्याचे अध्यक्ष विनायक जाधव यांनी तातडीने आपल्या शिक्षक समिती सदस्यांकडून मदत निधी उभारला. तळेरे विभागीय उपाध्यक्ष मंगेश मुद्रस , अनिल खोत, आशिष दुधे , प्रशांत कुडतरकर , सुनिल तांबे , प्रदिप श्रावणकर आणि स्वतः अध्यक्ष विनायक जाधव यांनी प्रत्यक्ष सोहम कासार्डेकर याच्या घरी जाऊन सोहमची विचारपूस केली. पुढील उपचारासाठी ५००० रुपयांची रोख आर्थिक मदत त्याच्या पालकांकडे सुपूर्द केली. सोहमचे पालक या मदतीने भारावून जात त्यांनी शिक्षक समितीचे व शाळा व्यवस्थापन समिती शिडवणे यांचे विशेष आभार मानले आहेत.






No comments:
Post a Comment